प्लॅस्टिक
प्लॅस्टिकने आपले सारे जग व्यापून टाकले आहे. अजून काही वर्षांत ही स्थिती अधिकच वाढणार आहे. प्लास्टिक नसलेली वस्तू त्या वेळी शोधावी लागेल, अशी परिस्थिती यावी, असा शास्त्रज्ञांचा प्रयत्न चालू आहे. त्या वेळी प्लास्टिकचे घर, प्लास्टिकची मोटार, वाहन आपण वापरत असू, असा त्यांचा कयास आहे.
पेन, पाटी, रेडिओ - टीव्ही कॅबिनेट्स, खुर्च्या, पादत्राणे येथपासून रेनकोट, कपडे, कपबशा येथपर्यंत प्लास्टिकने मजल मारली आहे. १८६२ साली अलेक्झांडर पार्क याने प्लास्टिक पॉलिमरचा प्रथम शोध लावला. अनेक रेणूंची साखळी असलेले हे प्लास्टिक जन्माला आले, ते हस्तीदंती रंगात. पण लवकरच ते विविधरंगी तर बनलेच, पण रेणूंच्या साखळीत थोडेफार बदल करीत किंवा सुरुवातीचे पदार्थ बदलत त्यांचे स्वरूप खूप वाढून विविध प्रकारचे होत गेले.
प्लास्टिक संशोधनाला खरी सुरुवात १९३० सालच्या सुमाराला झाली. मंदीचा काळ होता. लाकूड व पोलाद यांची निर्मिती कमी होती. त्यांना पर्याय म्हणून प्लास्टिकचा वापर त्याच काळात सुरू झाला. लाकडाप्रमाणे कुजत तर नाही व लोखंडाप्रमाणे गंजतही नाही म्हणून प्लास्टिक सगळ्यांचे लाडके बनू लागले. रबरी कोटिंग हळूहळू कडक बनत असते. रबरी पादत्राणे चिकटत असत. म्हणून प्लास्टिकने त्यांची जागा घेतली. हीच गोष्ट वायरिंगच्या इन्सुलेशनसाठी प्लास्टिक वापरायला कारणीभूत होत गेली.
१९६० सालच्या दशकात प्लॅस्टिकचे पुढील धागे म्हणजे नायलॉन, पॉलिएस्टर, अॅक्रिलिक यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती व वापर सुरू झाला. आज सर्वात स्वस्त व लोकप्रिय असे याच धाग्यांचे कपडे जगभर वापरले जातात. यानंतरचा लाडका वापर सुरू झाला, तो पाॅलिस्टिरिन व पीव्हीसीचा. सर्व पॅकिंगला पॉलिस्टिरिन फोम व पीव्हीसीची पादत्राणे आज प्रत्येकजण मागत असतो.
प्लॅस्टिक हे क्रूडतेलातील काही घटक वापरून बनते. काही मोजक्या प्रकारात लाकूड, कोळसा, नैसर्गिक गॅस यांचाही वापर करतात. यामुळे खनिज तेल जसे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून काढले जात होते, तसे प्लॅस्टिकचे उत्पादनही वाढत गेले. सुरुवातीचे प्लॅस्टिक अतिकडक असे. आज मात्र असंख्य प्रकारात व पाहिजे त्या आकारात प्लास्टिक उपलब्ध आहे.
प्लॅस्टिकचे दोन मुख्य प्रकार पडतात. एका प्रकारात दर वेळी उष्णता देऊन प्लास्टिक वितळवून त्याला नवीन आकार देणे शक्य होते. याला 'थर्मोप्लास्टिक' म्हणतात. दुसऱ्या प्रकारात मात्र एकदाच दिलेला आकार कायम राहतो. याला 'थर्मोसेटप्लास्टिक' म्हणतात. सुरीचे वा दाराचे हँडल या प्रकारातले असते, तर छोटे मोठे ट्रे, बादल्या या पहिल्या प्रकारातल्या.
प्लास्टिकचे कारखाने जगभर फार मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात. यासाठी छोट्या कारखान्यापासून ते अवाढव्य कारखान्यांपर्यंत विविध प्रकारची मशिनरी वापरली जाते. काचेचे वस्तू तयार करताना वापरल्या जाणाऱ्या पद्धतीने किंवा प्लॅस्टिकच्या रसात हवेचे बुडबुडे सोडून त्यांच्या साह्याने केलेल्या वस्तूंत बाटल्या, बरण्या बनतात. नायलॉनचे दोर बनवण्यासाठी लोखंडी दोराप्रमाणेच गरम रस लहान तोंडातून खेचण्याची पद्धत वापरली जाते, तर प्लास्टिकचे पापुद्रे रोलरवरुन दाबून बनवतात. सगळ्यात आकर्षक पद्धत म्हणजे एखाद्या तयार साच्यात पूर्ण दाबाने प्लॅस्टिक रस सोडण्याची. पाहिजे त्या आकाराची आकर्षक वस्तू या प्रकाराने एकसंधपणे निर्माण होते, हे विशेष. आपल्या रोजच्या वापरातल्या टूथब्रश, कंगवा, गमबूट, पेनस्टॅँड हे सारे या पद्धतीने बनते.
प्लास्टिकने आपले जग किती व्यापावे ? खेळाचे साहित्य तर प्लॅस्टिकचे असतेच; पण आता सारी मैदानेही पॉलिग्रासची म्हणजे प्लास्टिकची बनत आहेत. घरातील फुलदाण्या व त्यांतील फुलेही प्लास्टिकचीच वापरली जातात. सर्वांवर कडी म्हणजे एकमेकांना ओळखीसाठी दिली जाणार व्हिजिटिंग कार्ड्सही आता प्लास्टिकमध्येच बनू लागली आहेत. प्लास्टिक नष्ट करणे अवघड म्हणून त्याचा कचरा फार कटकटीचा ! एकच बाब यात चांगली आहे. प्लास्टिक म्हणजे कचकड्याचे जग असे मात्र न राहता अभेद्य, चक्क बुलेटप्रुफ असे प्लास्टिक सध्या वापरात येत आहे.