सुप्त शक्ती
रावणाने सीतेला लंकेत पळवून नेले. त्यानंतर सीतेचा शोध
घेता घेता रामाला समजले की रावणाने सीतेला लंकेत कैदेत ठेवले आहे. पण सीतेला लंकेत
शोधायला जायचे कसे ? हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला कारण मधे
समुद्र होता. हा एवढा मोठा समुद्र पार करून लंकेत कोण जाईल ? ह्याचा विचार होत असतांना अनेकांनी हनुमंताचे नाव सुचवले. पण हनुमंतालाही
आपण एवढा समुद्र पार करू का नाही ही खात्री वाटत नव्हती. त्यामुळे सगळीजण हताश
झाली होती. इतक्यात जांबुवंत तेथे आला आणि हनुमंताला म्हणाला, ”तुझ्याशिवाय
समुद्र कोण ओलांडणार ? तेव्हा समुद्र ओलांडून तुलाच लंकेत जायला लागेल.” त्यावर
हनुमंत म्हणाला,
”पण एवढा
समुद्र ओलांडण्याइतकी शक्ती माझ्यात कुठे आहे ?” यावर जांबुवंत पुन्हा म्हणाला,
”समुदा्र
ओंलाडण्याची शक्ती तुझ्यातच आहे. मोठी झेप घे. मनाची हिमत ठेव आणि जा !” हनुमंताची तयारी होत नाही असे पाहून जांबुवंत
त्याला सतत प्रोत्साहित करीत त्याचा उत्साह वाढवत होता. जांबुवंताची सतत
उत्साहवर्धक वाक्य ऐकून हनुमंताने सगळे बळ एकवटले आणि झेप घेऊन तो लंकेत जाऊन
पोहोचला.
तात्पर्य :-
स्वतः मध्ये असलेल्या सुप्त शक्ती कोणी प्रोत्साहित केल्यातर आयुष्य प्रकाशमान
होतं.