⚜️पात्रता⚜️
अकबर बादशहाच्या दरबारात एकदा एक चित्रकार आला होता.
त्याने एक अतिशय सुंदर चित्र काढून बादशहाला भेट म्हणून दले. चित्र पाहताच बादशहा
आणि त्याचे सर्व कुटुंबीय खूपच खुश झाले. चित्र ठेवून घेऊन बादशहा त्या
चित्रकाराला आता खूप मोठे बक्षीस देईल ही गोष्ट दरबारातील इतर मंडळींना अजिबात सहन
झाली नाही. मग एकेकाने त्या चित्रात दोष दाखवायला सुरुवात केली आणि हे चित्र रस्त्यावर
चौकात लावून प्रजेचं मत त्यावर घ्यावं असं सुचविण्यात आलं. पण मत कसं घ्यावं हे
बादशहाने विचारताच मंत्र्याने उत्तर दिले, ”चित्रात जिथे चूक
दिसेल तिथे प्रत्येकाने फुली मारावी.” झालं चित्र बघणारा
प्रत्येक जण चित्रावर फुली मारू लागला. हे पाहून चित्रकाराला अतिशय वाईट वाटले.
शेवटी तो मदत मागण्यासाठी बिरबलाकडे गेला. बिरबलाने त्याला एक कल्पना सुचवली, ”असेच दुसरे
चित्र काढा,
त्याच चौकात लावून खाली सूचना लिहा की, जो कोण
असेच्या असे, हुबेहूब चित्र काढेल त्यानेच चित्राखाली फुली
मारावी.” या वेळेस मात्र चित्राखाली एकही फुली मारली
गेली नाही आणि त्याचे चित्र उत्कृष्ट दर्जाचे आहे हे ही सिद्ध झाले.
तात्पर्य:-
स्वत:कडे पात्रता नसताना दुसर्याच्या
चुका काढणं खूपच सोपे असते.