⚜️ विद्याधन
भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती ⚜️
====================================================
भारत हा खेड्यांचा देश आहे. या खेडूत म्हणजेच ग्रामिण भाषेचे आणी ग्रामिण
बोली भाषेचे अघाद ज्ञान आहे. याच ग्रामिण भाषेतील काही शब्द खाली दिले आहेत. या शब्दाचे अर्थ पालकांच्या मदतीने शोधा
व आपल्या वहित लिहा.
1) कावळे 2) कालवण
/ कोरड्यास 3) आदण 4) कढाण 5) घाटा 6) हावळा 7) कंदुरी 8) हुरडा 9) आगटी 10) कासूटा,
काष्टा 11) घोषा 12) दंड 13) धडपा 14) कंबाळ / कयाळ 15) दंडकी 16) बाराबंदी
17) तिवडा 18) तिफण, चौपण 19) कुळव, फरांदी
20) यटाक 21) शिवाळ 22) रहाटगाडगं 23) रहाट 24) चाड 25) ठेपा 26) शेकरण 27) तुराटी
28) काड 29) भुसकाट 30) वैरण 31) जू 32) साठी 33) आरपाटा 34) ढकली 35) दांडी 36) आळदांडी
37) पिळकावणं 38) जूपणी, खिळ 39) बूट 40) हिसकी 41) कोळप 42)
फड 43) पास 44) वसाण 45) उंडकी 46) आडणा 47) फण 48) भूयट्या 49) रूमण 50) उभाट्या 51)
खांदमळणी 52) कंडा 53) चाळ 54) शेंट्या 55) झूल 56) आंबवणी, चिंबवणी
57) वाफा, सारा 58) मोट 59) पांद 60) व्हाण 61) मांदान 62) दुपाकी
घर 63) पडचीटी 64) वळचण 65) गुंडगी 66) उतरंड 67) पाभरी 68) कणींग 69) कणगूले 70) चुलवाण
71) काहिल 72) ढेपाळ 73) बलुतं 74) तरवा 75) लोंबी 76) सुगी 77) खळं 78) माचवा 79)
वगळ 80) शिंकाळं 81) गोफण 82) सपार / छप्पर 83) बाटूक 84) पिशी 85) झापा 86) माळवं
87) पावशा 88) कोठी घर 89) परस 90) पडवी 91) भंडारी 92) आगवळ 93) वज्री 94) कथळी 95)
चौपाळे 96) बारनी 97) शेजर 98) बुचाड 99) गंज 100) तलंग 101) कालवड 102) रेडकू 103)
दुरडी 104) हारा 105) बाचकं 106)
झोळणा 107) मोतीचूर 108) इराक्तीला 109) वटकावण, सोबणी 110) खंडी
110) मण 111) पायली 112) मापटं
113) चिपटं 114) कोळव
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
==============================================
उत्तरे :-
1) कावळे
- गाव
जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे कावळे .
2) कालवण / कोरड्यास – पातळ भाजी
3) आदण - घट्ट भाजीचा रस्सा त्याला आदण म्हणत.
4) कढाण - मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात.
5) घाटा - हरभर्याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो
त्याला घाटा म्हणतात.
6) हावळा - हरभरा तयार झाला की शेतातच
काट्याकुट्या गोळा करुन त्यात हरभरा भाजून खायचा त्याला हावळा म्हणतात.
7) कंदुरी - पूर्वी लग्नानंतर किंवा
एखादा नवस असेल तर देवाला बकरं कापलं जायचं व ते खाण्यासाठी गावातील लोकांना
जेवायला बोलवायचे. बकर्याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली भाजी घरी आणायची
नाही त्याला कंदुरी म्हणत.
8) हुरडा - ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसं
भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते खायला गोड असतात. त्यास हुरडा म्हणतात.
9)
आगटी - हुरडा भाजण्यासाठी जमिनीत थोडासा खड्डा खोदून त्यात
शेणकूट टाकून कणसं भाजली जातात त्याला आगटी म्हणतात.
10) कासूटा, काष्टा - पूर्वी सर्रास धोतर
नेसलं जायचं. धोतराची गाठ कमरेभोवती बांधल्यानंतर राहिलेल्या धोतराच्या निर्या
घालून पाठीमागे खोचल्या जायच्या त्याला कासूटा म्हणत आणि हाच प्रकार स्त्रियांनी
केला तर त्याला काष्टा म्हणत.
11) घोषा - पूर्वी ग्रामीण भागात पाटील किंवा उच्चभ्रू लोकांध्ये ज्या स्त्रिया लग्न
होऊन यायच्या त्यांना घोषा पद्धत असायची. म्हणजे घराबाहेर पडण्याचा प्रसंग आलाच तर
साडीच्या वरून शेळकट गुंडाळायचे व ते पूर्ण तोंडावर घ्यायचे... शेळकट पातळ
असल्यामुळे शेळकटातून बाहेरचे दिसायचे. परंतु चेहरा दिसायचा नाही. शेळकट नसेल तर
पदर तोंडावर असा ओढायचा की जेणेकरून चेहरा दिसणार नाही.
12) दंड - एखाद्या चुकीच्या कामामुळे शासन आर्थिक दंड
करते तो वेगळा. येथे दंड म्हणजे पूर्वी कपड्यांची कमतरता असायची. अशा वेळी
स्त्रिया एखादी साडी जुनी झाली तरा त्याचा जीर्ण झालेला भाग कापून काढायचा आणि
दुसर्या जुन्या साडीचा चांगला भाग काढायचा आणि हे दोन चांगले भाग शिवून एक आडी
तयार करायची.याला दंड घातला म्हणायचे.
13) धडपा - साडीचा भाग जीर्ण झाला असेल आणि त्याला दंड
लावायला दुसरी साडी नसेल तर साडीचा जीर्ण झालेला भाग काढून टाकला जातो व
नऊवारीसाडीची सहावारी साडी करून नेसली जाते. त्याला धडपा म्हणतात.
14) कंबाळ / कयाळ - पूर्वी स्त्रियांच्या नऊवारी
साड्या असायच्या त्या नेसताना पोटासमोर साडीच्या निर्या पोटावर खोचायच्या त्याचा
आकार केळीच्या कंबळासारखा व्हायचा किंवा केळासारखा दिसायचा म्हणून काही भागात
त्याला कंबाळ तर काही भागात त्याला क्याळ म्हणायचे.
15) दंडकी - म्हणजे आताचा हाफ ओपन शर्ट.
दंडकीला जाड मांजरपाठाच कापड वापरलं जायचं. त्याला पुढे खालच्या बाजूला दोन मोठे
खिसे, आतल्या बाजूला एक मोठा खिसा. तसेच त्याला गळ्याजवळ एक चोरखिसा असायचा.
16) बाराबंदी - पूर्वी ग्रामीण भागात शर्ट
नसायचा, जाड मांजरपटच्या कापडाचा छोट्या नेहरू शर्टसारखा आकार असायचा, त्याला बटण नसायची, बटणाऐवजी बांधण्यासाठी बंधांचा
वापर केला जायचा. तो शर्ट घातल्यानंतर बारा ठिकाणी बांधावा लागायचा म्हणून त्याला
बाराबंदी म्हणत.
17) तिवडा - पूर्वी धान्य मळण्यासाठी
खळ्याचा वापर करत. खळ्यात कणसं टाकून त्यावर बैल, म्हैस फिरवली जायची. त्यांना
गोल फिरता यावे म्हणून खळ्याच्यामध्ये उभे लाकूड रोवले जायचे त्याला तिवडा म्हणत.
18) तिफण, चौपण - पूर्वी शेतात धान्य
पेरण्यासाठी कुरीचा (पाबर) वापर करत. पिकामध्ये जास्त अंतर ठेवायचे असेल तर
तिपणीचा वापर करत,
अंतर कमी ठेवायचे असेल तर चौफणीचा वापर करत.
19) कुळव, फरांदी - शेतात पेरण्यापूर्वी
शेती स्वच्छ करण्यासाठी गवत, कचरा काढण्यासाठी कुळवाचा वापर केला जात असे.
जास्त अंतर ठेवून शेती स्वच्छ करायची असेल तर फरांदीचा वापर करत.
20) यटाक - कोणतेही औत ओढण्यासाठी शिवाळ/ जू याचा वापर
करताना ते जोडण्यासाठी ज्या सोलाचा वापर करत त्याला यटाक म्हणत.
21) शिवाळ - पूर्वी शेती नांगरण्यासाठी लाकडी, लोखंडी नांगराचा
वापर केला जायचा. नांगर ओढण्यासाठी सहा-आठ बैल लागायचे, ते
ओढण्यासाठी बैल शिवाळी ला जोडली जायची.
22) रहाटगाडगं - पूर्वी शेतीला पाणी देण्यासाठी मोटेचा किंवा रहाटगाडग्याचा वापर केला
जायचा. रहाटगाडग्याला छोटे छोटे लोखंडी डबे जोडून गोलाकार फिरवून विहिरीतून पाणी
काढलं जायचं त्याला रहाटगाडगं म्हणतात.
23) रहाट - पाणी पिण्यासाठी आडातून पाणी काढण्यासाठी
रहाटाचा वापर केला जायचा. बादलीला कासरा बांधला जायचा. ती राहाटावरून खाली सोडली
जायची. पाण्याने भरली की वर ओढून घ्यायची व जवळ आली की हाताने बाहेर काढून
घ्यायचं.
24) चाड - शेतात धान्य पेरण्यासाठी चारी नळ्यातून सारखं
बी पडावं म्हणून चाड्याचा वापर केला जायचा.
25) ठेपा - पूर्वी जनावरांना बांधण्यासाठी लाकडी
मेडक्याचा ( Y आकाराचे लाकूड) वापर करून छप्पर तयार केलं जायचं. पावसाळ्यात छप्पर एका
बाजूला कलंडले तर ते पडू नये म्हणून लाकूड उभे करून त्याला आधार दिला जायचा त्याला
ठेपा म्हणत.
26) शेकरण - पूर्वी घरं कौलारू होत तेव्हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी घर गळू नये
म्हणून दरवर्षी कौलं व्यवस्थित लावली जायची त्याला शेकरण म्हणत.
27) तुराटी - तुरी बडवून जी काटकं राहायची
त्याला तुराटी म्हणतात. याचा उपयोग घर शेकारण्यासाठी केला जायचा.
28) काड - गहू
बडवून जी काटकं राहायची त्याला काड म्हणतात. काडाचाही उपयोग शेकरण्यासाठी केला
जात.
29) भुसकाट - धान्य मळल्यानंतर जो बारीक
भुगा राहतो त्याला भुसकाट म्हणतात. याला जनावरं खातात.
30) वैरण - ज्वारी, बाजरी काढल्यानंतर जो भाग एका जागी
बांधून पेंडी बांधली जायची त्याला वैरण म्हणतात.
31) जू - औत, बैलगाडी, कुळव
ओढण्यासाठी बैलाच्या खांद्यावर जे आडवं लाकूड ठेवलं जायचं त्याला जू म्हणत.
32) साठी - वयाची एक साठी असते आणि दुसरी बैलगाडीची साठी
असते या साठीचा उपयोग शेतातील माल, डबा, धान्याची
पोती, शेणखत, बाजारचा भाजीपाला
वाहण्यासाठी केला जातो. त्याची रचना अशी असते - खाली-वर बावकाडे असतात. खालच्या
वरच्या बावकाडाला भोक पाडून लाकडं ताशीव नक्षीदार उभी केली जातात. त्याला करूळ
म्हणतात. करूळाच्या वर एक बावकाड असतं त्यामध्ये करूळी फिट केली जातात. ज्यामुळे
साठीची उंची वाढते व शेतीचा जास्त माल बसतो. साठीला खाली आडवी लाकडं टाकली जातात.
त्याला तरसे म्हणतात.त्यावर फळ्या टाकल्या जातात. ज्यामुळे साठीतला माल वाहतूक
करताना खाली पडत नाही.
33) आरपाटा - बैलगाडी ओढण्यासाठी दोन
चाकांची गरज असते. चाक दणकट होण्यासाठी साठीच्या खाली एक बूट असतं, त्यावर
लोखंडी कणा ठेवला जातो. तो कणा साठीच्या बाहेर गोलाकार लाकडू असते, त्याला मणी म्हणतात.त्या मण्यामध्ये कणा बसवला जातो. मण्याला लहान-लहान
भोकं असतात. त्यामध्ये आर लाकडाच्या उभ्या दणकट पट्ट्या बसवल्या जातात. त्या आर्यामध्ये
बसवतात. आर झिजू नयेत म्हणून त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते त्याला धाव म्हणतात.
34) ढकली - बैलगाडीच्या साठीच्या पुढच्या तोंडाला एक आडवं
लांब लाकूड लावलं जाते त्याला ढकली म्हणतात. या ढकलीचा उपयोग बैल पाठीमागे सरकायला
लागला तर तो ढकलीमुळे मागे सरकणे थांबतो.
35) दांडी - बैलगाडीसाठी चाकं तयार झाली
की ती ओढण्यासाठी बुट्याला साठीच्याखाली जो चौकोनी लाकडाचा ठोकळा असतो त्याला तीन
भोकं पाडली जातात त्यामध्ये तीन साठीपेक्षा ५/६ फूट लांबीची लाकडं बसवली जातात.
त्यावर जू ठेवलं जात. जू आणि बूट याला यटक घातलं जातं. त्यात बैल जोडून गाडी ओढली
जाते.
36) आळदांडी - गाडीला ज्या तीन दांड्या
बसवल्या जातात. त्यापैकी दोन ज्वापेक्षा थोड्या लांब असतात. तिसरी दांडी
ज्वापेक्षा कमी लांबीची,
पण ज्वापर्यंतच्या लांबीची असते. या आळदांडीमुळे जू मागे सरकत नाही
आणि यटकामुळे पुढे सरकत नाही.
37) पिळकावणं - गाडीला किंवा कोणत्याही औताला जे यटाक घातलं
जातं ते ढिले राहू नये म्हणून दोन-फूट लांबीचा लाकडाचा दांडा चरकात घालून पिळलं
जातो, जेणेकरून यटाक ढिल होत नाही. त्याला पिळकावणं म्हणतात.
38) जूपणी, खिळ - जूला दोन्ही बाजूला
शेवटच्या टोकाला दोन भोकं पाडलेली असतात. त्यात दोन-तीन फूट लांबीचा लाकडी दांडा
घालून वरच्या बाजूला जराजाड ठेवला जातो. जुपणीला बारीक रस्सीनं विणलेला ३/४ फुटाचा
पट्टा बांधलेला असतो. जेव्हा बैल गाडीला जुंपतात, तेव्हा जू उचललं जातं. बैल जू
खाली घेतात ज्वाच्या भोकात दोन्हीबाजूला जुपण्या बसवतात व जुपणीला घेऊन जुपणीत
अडकवला जातो.जेणेकरून बैलगाडी चालू झाल्यानंतर बैल इकडं-तिकडं हलत नाहीत. बैल सरळ
चालतात. त्यामुळे इकडे-तिकडे झाल्यास खिळ बसते म्हणून जुपणी किंवा खिळ म्हणतात.
39) बूट - बैलगाडीच्या साटीला आधार व दोन चाक जोडण्यासाठी
त्यावर कणा ठेवला जायचा. असे चौकनी लाकूड असायचे त्यालाच बैलगाडी ओढण्यासाठी दोन
दांड्या जोडल्या जायच्या त्याला बूट म्हणायचे.
40) हिसकी - खाली वाय आकार असलेली परंतु
लांब काठी असते. त्या काठीचा उपयोग कोणतीही वस्तू दाबून धरण्यासाठी केला जातो
त्याला हिसकी म्हणतात.
41) कोळप - पिकाची आंतर मशागत करण्यासाठी
व पिकातील तण काढण्यासाठी ज्या औताचा उपयोग केला जातो त्याला कोळप म्हणतात.
42) फड - फड तीन प्रकारचे असतात जेथे तमाशा असतो तो
तमाशाचा फड, जेथे कुस्त्या चालतात त्याला कुस्त्यांचा फड, जेथे
ऊस तोडतात त्या शेताला ऊसाचा फड म्हणतात.
43) पास - पूर्वी शेतातील तण गवत काढण्यासाठी कुळव किंवा
फरांदीचा वापर केला जायचा त्याला दोन जानावळी असायची त्याला पास जोडलेली असायची
त्यामुळे जमिनीतून खालून गेल्याने गवत तण मरून जाते.
44) वसाण - शेतात कुळव चालवताना कुळवाच्या किंवा
फरांदीच्या पासत गवत अडकून पास भरकटायची जे अडकलेले गवत असायचे त्याला वसाण म्हणत.
45) उंडकी - पूर्वी पेरताना तीन किंवाचार
नळ असायचे. पेरताना एखाद्या नळातून बी पडत नसेल तर त्याला उंडकी म्हणायचे.
46) आडणा - वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवं लाकूड
लावलं जायचं जेणेकरून दरवाजाचं दार जोरात ढकललं तरी उघडू नये.
47) फण - कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी भोकं
असतात त्यात फण बसवला जातो. फणाला मध्येच एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो. त्यात नळ
जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात. चाड्यातून बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान
अंतरावर पडतं. फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर लोखंडी पट्टी बसवली
जाते. त्याला फासळ म्हणतात.
48) भूयट्या - जमीन भुसभुशीत असेल तर औत, कुळक,
फरांदी, कुरी दिंडावर उभं न राहता मोकळी
चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचं. त्याला भूयट्या म्हणतात.
49) रूमण - औत भूयट्या चालवताना दिंडाला
मधोध एक भोक असतं त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो व दांड्याच्य वरच्या बाजूला एक
आडवं लाकूड लावलं जातं. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.त्याला रूमण म्हणतात.
50) उभाट्या - जमीन कठीण असेल औत जमिनीत
जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवलं जातं त्याला उभाट्या म्हणतात.
51) खांदमळणी - बैलांचा महत्त्वाचा सण
बेंदूर. बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामं, खरीपाची पेरणी ही कामं उरकली जायची.
बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट केलेले
असतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते. बैलाच्या मानेला साद हणतात. खांदाला त्रास
झालेला असतो म्हणून खांदाला तेल, हळद, तूप
लावून त्याचे मालीश केले जाते त्याला खांदमळणी म्हणतात.
52) कंडा - बेंदरादिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम
पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा
बांधला जातो त्याला कंडा म्हणतात.
53) चाळ - बैलाच्या मानेएवढा कातडी पट्टा घेऊन त्यात
वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला चाळ म्हणतात.
54) शेंट्या - बेंदराच्या अगोदरच बैलाची
शिंग घोळली जातात. बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून शिंगाच्या वरच्या बाजूला
लोखंडी किंवा पितळी शेंट्या बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात.
55) झूल - बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी
त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते. त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात.
त्याला झूल म्हणतात.
56) आंबवणी, चिंबवणी – शेतात कोणत्याही
रोपाची कांदा, वांगी, कोबी,फ्लॉवर, ऊस, लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली
असते. त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते. रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते
आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते म्हणून दुसरे दिवशी पाणी
दिले जाते त्याला आंबवणी व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते त्याला चिंबवणी
म्हणतात.
57) वाफा, सारा - कोणत्याही पिकाला
पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे करतात. वाफा किंवा सारा म्हणजे त्याच्या एका
बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.जेणेकरून
पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहानआकाराचा असतो त्याला वाफा
म्हणतात, तर मोठ्या आकाराचा असतो त्याला सारा म्हणतात.
58) मोट - पूर्वी शेतीला पाणी पाजण्यासाठी इंजिन किंवा
इलेक्ट्रिक मोटारीचा शोध लागण्यापूर्वी मोटेचा वापर करत असत. मोट म्हणजे जाड
पत्र्याचे एक चौकोनी साधारण ५० लीटर पाणी बसेल असे भांडं तयार करायचे, त्याला खाली
तळात एक चौकोनी बोगदा ठेवला जायचा. त्यावर आत मोटेमध्ये उघडझाप होईल असे झाकण
असायचे. विहिरीच्या एका भिंतीला दोन उभी व एक आडवं लाकूड कायम केलेले असायचे.
त्याच बाजूला जमिनीवर उताराचा भाग तयार केलेला असायचा त्याला धाव म्हणत. जे आडवं
लाकूड असायचं त्याला एक चाक बसवलेले असायचं. मोटेच्या वरच्या बाजूला एक साखळी
असायची त्याला नाडा बांधायचा. (नाडा म्हणजे जाड ५०/ ६० फूट लांबीचा कासरा)
मोटेच्या खालच्या बाजूला एक साखळी असायची त्याला सोल बांधले जायचे नंतर मोट
विहिरीत सोडायची. त्याला दोन बैल जोडलेले असायचे. बैल धावेवरून मागे सरत आले की
मोट पाण्यात बुडायची. मोट पाण्यात बुडली की मोटेत आत उघडझाप होणारे जे झाकण असते
ते उघडायचे. मोट पाण्याने भरली की नाडा, सोल यांना ताण
यायचा. मोट भरली कीबैल धावेवरून पुढे हाणायचे. मोट विहिरीच्या वर आली की पाणी
थारोळ्यात पडायचे. (थारोळं - दगडी बांधकाम केलेला चौकोनी हौद) ते पाणी पाटात,
शेतात जायचं. पुन्हा मोट मागे बैल सरकवत न्यायची. पुन्हा वर आणायची
ही क्रिया दिवसभर चालवून शेताला पाणी दिलं जायचं.
59) पांद - शेतात जाण्यासाठी दोन्ही बाजूला झाडी आणि मधून चिखलमातीचा जो रस्ता.
60) व्हाण - पूर्वी चटणी तयार करण्यासाठी किंवा कालवणाचा मसाला तयार केला जायचा ते
जमिनीत रोवलेला मध्ये खोलगट भाग असलेला मोठा दगड असतो. खोलगट असून ते बारीक
करण्यासाठी लाकडी मुसळाचा किंवा लोखंडी ठोंब्याचा वापर केला जायचा.
61) मांदान - स्वयंपाक करताना खरकटं पाणी टाकण्यासाठी चुलीजवळ एक चौकनी खड्डा केला
जायचा. त्याला पांढर्या मातीचे प्लॅस्टर केलं जायचं त्यामुळे पाणी जमिनीत मुरत
नव्हतं. त्या मांदानात खरकटं पाणी टाकलं जायचं त्याला मांदान म्हणत.
62) दुपाकी घर - मध्ये उंच भाग त्याला आड म्हणतात. त्या आडाच्या दोन्ही बाजूला उतरता पत्रा
किंवा कौलं टाकून पाणी पडण्यासाठी जे घर असते ते दुपाकी.
63) पडचीटी - दुपाकी घराला लागूनच एकाच बाजूला पाणी पडेल असा जो निवारा केला जातो.
64) वळचण - घराच्या उतरत्या भागावरून जे
पाणी पडते तो पत्र्याचा भाग जरा लांबपर्यंत घेतलेला असतो त्यामुळे पाणी घरापासून
लांब पडते. या वळचणीला जनावरे, लोक निवार्याला उभी राहतात.
65) गुंडगी - गाडग्याचा सर्वात छोटा अवतार
66) उतरंड - घरात ज्या छोट्या-छोट्या वस्तू असायच्या त्या या गाडग्यात भरून उतरंडीला
ठेवायच्या. उतरंडीची रचना सर्वात मोठं गाडगं तळात नंतर लहान, लहान असे ठेवत १०/११ गाडगी एकावर एक ठेवायची व शेवटच्या गाडग्यावर झाकण
म्हणून गुंडगीचा उपयोग व्हायचा.
67) पाभरी - पितांबराच्या वर नेसण्याचे
वस्त्र असते.
68) कणींग - कळकाच्या कांब्यापासून
पिंपासारख्या आकाराचे धान्य ठेवण्यासाठी केलेले असते त्याला आतून बाहेरून शेणाने
सारवले जायचे.
69) कणगूले - कणगीचा छोटा आकार परंतु
जाडीने जास्त. टोपलं - पूर्वी भाकरी ठेवण्यासाठी कळकाच्या कांब्यापासून
घमेल्याच्या आकाराचे तयार केलेले असे.
70) चुलवाण - उसापासून गूळ तयार करण्यासाठी
गोलाकार आतून पोकळ उंच असा भाग बांधलेला असतो त्याच्या एका बाजूला जळण टाकण्यासाठी
दरवाजा ठेवलेला असतो.
71) काहिल - काहिल चुलवाणावर ठेवली जाते.
ऊसाचा रस तयार झाला की,
तो काहिलीमध्ये टाकला जातो. नंतर चुलवाणाला खालून जाळ घातला जातो.
पातळ रसाचे घट्ट गुळात रूपांतर होते. वाफा - गूळ तयार होत आला की, काहिलीला दोन लांब लाकडं अडकवली जातात आणि ७/८ लोकांनी ती काहिल ओढत आणून
तयार झालेला गूळ वाफ्यात ओतला जातो.
72) ढेपाळ - गोलाकार पत्र्यापासून तयार
केलेले असते. १ किलो,
५ किलो, १० किलो अशा वेगवेगळ्या आकाराची
असतात. त्यामध्ये गूळ भरण्यापूर्वी आतून तेल लावले जाते. ढेपाळ्यात गूळ भरतात.
ढेपाळ्यात गूळ थंड झाल्यानंतर ते ढेपाळे पालथे केले की ढेप बाहेर येते.
73) बलुतं - पूर्वी वस्तूविनिमयाची पद्धत
होती. त्यावेळी शेतकर्यांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या. सुतार, लोहार,
तेली, माळी असे बारा प्रकार असायचे त्यांना
बलुतं म्हणत. या बलुत्यांना शेतकरी आपल्या शेतात जे पिकेल ते थोडं थोडं
प्रत्येकालाच देत असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे.
74) तरवा - कोणत्याही रोपाची
लागण करण्यापूर्वी वाफ्यामध्ये रेघा ओढून कांदा, वांगी, फ्लॉवर,
कोबी जे पाहिजे त्याचं बी पेरलं जातं. पाणी दिल्यानंतर १०/१२
दिवसांनी ते दिसायला लागतं. त्याला तरवा म्हणतात.
75) लोंबी - गहू पेरल्यानंतर ज्यामध्ये
गहू तयार होतो त्याला लोंबी म्हणतात.
76) सुगी - ज्वारी, बाजरी,
गहू, तांदूळ ही पीक काढायला आली की तो
काढणींचा काळ होता त्याला सूगी म्हणत.
77) खळं - कणसापासून ज्वारी तयार करण्यासाठी शेतात
गोलाकार भागावरची माती काढून त्याच्या मधोमध एक लाकूड रोवलं जायचं. त्याला तिवडा
म्हणत. माती काढल्यावर तिवड्याभोवती बैल गोलाकार फिरवला की जमीन कठीण व्हायची.
नंतर त्यावर कणसं टाकून बैल गोलाकार फिरवून त्यातील सर्व ज्वारी निघाली की वावडीवर
उभं राहून वाढवायची.
78) माचवा - पूर्वी ज्वारीच्या शेताची
कणसं आल्यानंतर पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधलेला माळा.
79) वगळ - ओढ्याचा छोटा आकार.
80) शिंकाळं - मांजर, उंदीर
यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी दही, दूध, तूप हे तुळईला अडकवून ठेवण्यासाठी वाकापासून तयार केलेलं असत.
81) गोफण - शेतात ज्वारी, बाजरी
यासारख्या पिकांचे पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी दगड-माती मारण्यासाठी
रश्शीपासून तयार केलेली असायची.
82) सपार / छप्पर – जनावरांच्या संरक्षणासाठी शेतात
लाकडं व पालापाचोळ्यापासून तयार केलेलं घर.
83) बाटूक - ज्वारीच्या शेतात ज्याला कणसं
येत नाहीत त्याला बाटूक म्हणतात.
84) पिशी - ज्वारीच्या कणसाचा हुरडा
काढल्यानंतर जो भाग राहातो त्याला पिशी म्हणतात.
85) झापा - शेतात जनावरांच्या
संरक्षणासाठी जे सपार तयार केलेलं असतं त्याला लावायचे दार म्हणजे झापा.
86) माळवं - शेतात केलेला
भाजीपाला
87) पावशा - पूर्वी एखाद्या वर्षी
पाऊस कमी असेल तर खेडेगावात सर्व मुलं एकत्र जमत. गावाबाहेर जाऊन एखाद्या मुलाला
नग्न करायचे. त्याच्या कमरेभोवती लिंबाचा पाला बांधायचा. डोक्यावर पाट ठेवायचा.
पाटावर पिंड काढायची आणि गावात येऊन प्रत्येक घरापुढे ‘पावशा ये रं तू नारायणा’ हे
गाणं म्हणायचं, मग त्या घरातील स्त्री पाण्याचा तांब्या व भाकरी घेऊन बाहेर येणार पाणी
पायावर ओतणार आणि भाकरी चटणी देणार. सर्व जमवलेल्या भाकरी शेतात जाऊन खायच्या.
88) कोठी घर - वाड्यातले धान्याचे कोठार.
89) परस - वाड्याच्या पाठीमागे मोकळी जागा असायची, त्यामध्ये छोटी-मोठी झाड असायची.
90) पडवी - वाड्यात मधल्या चौकासभोवार जो
वाड्याचा भाग असायचा त्याला पडवी म्हणत.
91) भंडारी - घराच्या भिंतीत, खूप रुंद
असलेल्या भिंतीतच एक चौकनी पोकळ भाग ठेवला जायचा त्याला छोटी दार- कडीकोयंडा
असायचा. यामध्ये घरातील महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जायच्या.
92) आगवळ - लहान मुलींचे केस लोकरीच्या
धाग्याने वेणीसारखे बांधावयाचा धागा.
93) वज्री - आंघोळ करताना अंग घासायची
घासणी.
94) कथळी - चहाची किटली.
95) चौपाळे - सार्वजनिक जेवणात वेगवेगळ्या
वस्तू एकाच भांड्यात ठेवून वाढल्या जायच्या ते भांडे.
96) बारनी - खिडकीचा छोटा प्रकार असायचा
त्याला बारनी म्हणत.
97) शेजर -पूर्वी ज्वारी, बाजरी, आरगड,
गिडगाप अशी धान्या ची पिकं काढली म्हणजे एकत्र ठेवली जायची. ती
एकत्र ठेवण्यासाठी कडब्याच्या पेंढ्या बांधून पेंढ्या एकावर एक ठेवून खोलगट चौकोन
तयार केला जायचा त्याला शेजर म्हणायचे.
98) बुचाड - पूर्वी पीक काढल्यानंतर
वाटायला वेळ नसेल तर कणसासह कडबा एकत्र लावला जायचा तो लावताना कडब्याच्या पेंढ्या
खाली कणसं आणि वर बुडके असे लावले जायचे त्याचा आकार खाली रुंद आणि वर निमुळते असे
त्रिकोणी आकाराचे लावले जायचे. जेणेकरून पावसापासून संरक्षण व्हावे याला बुचाड
म्हणतात.
99) गंज - पीक काढल्यानंतर त्यांची कणसं काढून झाली की
पेंढ्या बांधल्या जातात. त्या पेंढ्याचा उपयोग जनावरांच्या चार्यासाठी होतो
म्हणून त्या पेंढ्या एकत्र केल्या जातात व त्या आयताकार रचल्या जातात. निम्म्यात
गेल्यानंतर वरचा भाग त्रिकोणी केला जातो. जेणेकरून ऊन, वारा,
थंडी, पाऊस यापासून त्याचे संरक्षण होते.
त्याला गंज म्हणतात.
100) तलंग - कोंबडीच्या लहान पिल्लाला
तलंग म्हणतात.
101) कालवड - गाईच्या लहान पिल्लाला
स्त्रीलिंगी असले तर कालवड म्हणतात व पुल्लिंगी असेल तर खोंड म्हणतात.
102) रेडकू - म्हशीचे लहान पिल्लू
स्त्रीलिंगी रेडकू आणि पुल्लिंगी असेल तर टोणगा/रेडा म्हणतात.
103) दुरडी - दुरडी कळकाच्या कांब्यापासून
तयार करतात त्यातून पाणी गळते... धान्यात माती, कचरा असला तर ते धान्य दुरडीत टाकायचे
दुरडीत पाणी घेऊनकिंवा पाण्यातच दुरडी हालवायची त्यामुळे माती केर-कचरा निघून
जातो.
104) हारा - कळकाच्या कांब्यापासून विणून
तयार केलेला असतो. लहान असते त्याला टोपलं म्हणतात, मोठ असेल त्याला हारा म्हणतात.
जास्तकाळ हारा टिकावा म्हणून शेणाने सारवला जातो.
105) बाचकं - धान्य भरण्यासाठी पोत्याचा
उपयोग केला जातो त्यात छोटं पोतं असते त्याला बाचकं म्हणतात.
106) झोळणा - पूर्वी पंचमीला मुली नागोबाला जायच्या तेथे फेर धरून खेळ खेळायच्या
जाताना लाह्या, फुटाणे, शेंगदाणे एकत्र
करून झोळणा भरायचा व त्यातील भेटेल त्याला थोडं थोडं खायला द्यायचं. झोळणा म्हणजे
झोळीच्या छोट्या आकाराचा असायचा.
107) मोतीचूर - हा एका ज्वारीचाच प्रकार आहे.
परंतु हा मोतीचूर तव्यात टाकून भाजला की त्याच्या पांढर्या लाह्या तयार होतात.
लाह्या तयार होताना त्याचा ताडताड आवाज येतो. त्या तव्याच्या बाहेर जाऊ नयेत
म्हणून त्याला फडक्याने दाबून धरले जाते.
108) इराक्तीला - पूर्वी लघवी हा शब्द प्रचलित नव्हता. त्या वेळी
स्त्रिया लघवीला जायचं म्हटलं की इराक्तीला म्हणायच्या.
109) वटकावण, सोबणी - भाकरी भाजीत भिजू नये
म्हणून पितळीत भाकरी ज्या बाजूला असेल त्या बाजूला उंचवटा करायचा. हा उंचवटा
करण्यासाठी एका बाजूला उतार असलेला लाकडाचा तुकडा असायचा. त्यालाच वटकावण किंवा
सोबणी म्हणत.
110) खंडी - २० मणाची खंडी.
110) मण - ४०
शेराचा मण.
111) पायली - दोन आडबसीर्या म्हणजे पायली.
112) मापटं - एक शेर म्हणजे मापटं.
113) चिपटं - दोन चीपटं म्हणजे एक मापटं.
114) कोळव - दोन कोळवी म्हणजे एक चीपट.