असंतुष्ट मोर
एके दिवशी मोराला आपला आवाज फार कर्कश आहे ह्याचे फार
दुःख झाले. म्हणून त्याने सरस्वती देवीची प्रार्थना केली, 'हे देवी !
मी तुझे वाहन असता स्वरामध्ये कोकिळेने मला लाजवावं हे तुझ्या कीर्तीस
शोभण्यासारखं नाही. कोकिळा बोलू लागली म्हणजे सर्व लोकांचे कान तिकडे लागतात आणि
मी तोंड उघडलं की लोक माझी थट्टा करतात.'
मोराचे हे
बोलणे ऐकून देवी त्याची समजूत घालत म्हणाली, 'अरे, कोकिळा
तिच्या गोड आवाजामुळे श्रेष्ठ आहे असे तुला वाटतं, पण देखणेपणा
व मोठेपणा यांच्या बाबतीत तूही भाग्यवान आहेस. देवीचे हे बोलणे ऐकून मोर म्हणाला, 'देवी, आवाज गोड
नाही तर देखणेपणा काय करायचा आहे?' त्यावर देवी म्हणाली, 'अरे देवाने
प्रत्येकास एकेक गुण दिला आहे. तुला सौंदर्य, गरुडाला बळ, कोकिळेला
आवाज,
पोपटाला
बोलण्याची शक्ती, पारव्याला शांती. हे पक्षी जसे आपापल्या गुणांवर
संतुष्ट आहेत, तसं तूही असावंस, उगाच आशा
वाढवून दुःख करण्यात अर्थ नाही.'
तात्पर्य :-
एकाच्याच अंगी सगळे गुण आढळत नाहीत. तेव्हा आपल्या अंगी जो गुण असेल त्याचाच
चांगला उपयोग करून आपण समाधानी असावे.