⚜️अपमान आणि उपकार⚜️
एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात
त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके
कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला
थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो
आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या
प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज
मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही
पुढे चालत राहतात.
पुढे
गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता
करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी
दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत
मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो
आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर
येतो,
अंग
कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या
प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच
असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले."
हे पण तो
थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी
तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर
कोरून लिहिले हे असे का?"
लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या
हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत
लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार
काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले
कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले
जावेत.
तात्पर्य :-
माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे.