⚜️बोलण्याआधी विचार करावा⚜️
विकीचे तोंड खूप मोठे होते. विकी मोठयाने तोंडाचा 'आss' करायचा आणि
तोंड पसरून हसायचा. तो होता सहा वर्षांचाच पण सारखे प्रश्न विचारायचा आणि
दुस-यांच्या गोष्टीतही ढवळाढवळ करायचा. विकीची वाईट सवय काय होती माहितीये का? मागचा पुढचा
विचार न करता विकी डोक्यात येईल ते पटकन बोलून मोकळा व्हायचा आणि त्यामुळे कायम
अडचणीत यायचा. विकीला आपल्या बोलण्यावर किंचितही ताबा रहात नसे. डोक्यात विचार आले
की सारे शब्द विकीच्या कानात घुमायला लागून, नाकावर
आपटून,
तोंडातून
लाहयांसारखे पटापट बाहेर पडायला लागत. त्या दिवशी शाळेत सगळ्यांना बाईंनी
लिहीण्याचा सराव करायला सांगितले. विकीसुध्दा मन लावून वळणदार अक्षर काढण्याचा
प्रयत्न करत होता. त्याने सहज वर बघितले तर ईशानी चुकीच्या पध्दतीने पेन्सिल पकडून
लिहीत होती. बाई तिला समजावून सांगणार इतक्यात विकीच्या डोक्यात विचार आले, कानात घुमले, नाकावर
आपटले आणि लाहयासारखे पटापट बाहेर पडले'', ईशानी तुला नीट पेन्सिल सुध्दा पकडता येत नाही
का?
" बाईंना
भयंकर राग आला. चष्मा नाकावर घेत त्या म्हणाल्या, ''विकी
स्वत:चे काम सोडून दुस-यांच्या कामात नाक खुपसू नकोस''. विकीला खूप
अपमानित झाल्यासारखे वाटले. सारी वर्गातली मुले विकीकडे रागाने बघत होती. शाळा
संपेपर्यंत कोणीच त्याच्याशी बोलले नाही. उदास झालेला विकी शाळेतून घरी जाता जाता
विचार करीत होता. ''सगळे माझ्याशीच असे का वागतात? मला का
कोणीच मित्र नाहीत?'' घरी पोहोचेपर्यंत तोंडावर बराच ताबा झाला होता.
घरात शिरल्या बरोबर त्याला चॉकलेट केकचा खरपूस वास आला. त्याची आई आणि बालवाडीत
जाणारी छोटी बहिण मिनी केकवर रंगीत गोळयांनी सजावट करत होत्या. एकीकडे मिनी आईला
रंग सांगत होती. ''आई, हा बघ लाल रंग'', आई, हा बघ पिवळा
रंग'',
हे
पाहताच विकीच्या डोक्यात विचार आले, कानात घुमले, नाकावर
आपटून,
तोंडातून
पटापट बाहेर पडले. ''आई, मला तर ह्या रंगाचे स्पेलिंग्सही माहित आहेत
सांगू R...E...D, Y..E..L..L..O..W. विनी हे ऐकून
हिरमुसली होऊन बेडरूममध्ये गेली. हे सारे पाहून आई रागावली आणि विकीला खूप ओरडली.
विकीला वाईट वाटले. आई मला लहान बहिणीसमोर ओरडली माझा इतका अपमान. चॉकलेट केकची
मज्जाच हरवली.
एवढयात
बेल वाजली. मुलांचे लाडके नाना आजोबा आले होते. मुलांनी खुशीत येऊन आजोबांना मिठी
मारली. आजोबांना विनी आणि विकीचे बदलणारे मूड चटकन समजत त्यामुळे आजोबांनी विकीला
नाराजीचे कारण विचारले. विनीने सकाळपासून घडलेले आजोबांना सविस्तर सांगितले.
आजोबांनी 'हूं ! असे आहे तर सारे' म्हणत मोठा
श्वास घेतला आणि विकीला म्हणाले ''चल बाहेर फिरून येऊ या''. आणि क्षणात
बाहेर निघाले सुध्दा.आजोबा सर्वात प्रथम सैनिक शिक्षण देणा-या शाळेत विकीला घेऊन
गेले. तेथे छोटया मुलांना घोडेस्वारी शिकवत होते. एवढया मोठया घोडयांवर विकीच्या
वयाची मुले ताबा कसा मिळवायचा शिकत होती. प्रशिक्षित घोडेस्वाराचे कौशल्य तर
पाहण्यासारखे होते. आजोबांनी विकीला म्हटले, ''बघ, विकी एवढया
मोठया घोडयाला कसे काबूत ठेवले जातेय''. विकी सारे पाहून विचारात पडला.
आजोबा
त्याला तसेच विचारात राहू देत म्हणले, ''चल तुला आणखी एक गंमत दाखवतो''. आजोबा एका
ठिकाणी जेथे बांधकाम चालू होते तेथे घेऊन गेले. मोठया क्रेनच्या साह्य्याने दगड,माती एका
ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलविण्याचे काम चालू होते. एवढया मोठया क्रेनला चालवत
होता एक चालक. आजोबांनी विकीला म्हटले, ''बघ आपल्यासारखीच शक्ती असणारा चालक आहे तो. पण
एवढया मोठया क्रेनवर ताबा कसा ठेवतोय.''
एवढयात
त्यांना आगीच्या बंबाचा हॉर्न ऐकू येऊ लागला. थोडे पुढे गेल्यावर त्यांनी पाहिले
की एका इमारतीला आग लागली होती आणि सारीकडे धावपळ चालली होती. हे पाहून आजोबांनी
चौकशी केली. पोलिसांनी सांगितले एका दहा वर्षाच्या मुलाच्या हलगर्जीपणामुळे, काडेपेटीशी
खेळत असतांना आग लागली. थोडावेळ थांबून आजोबा आणि विकी परत निघाले. जातांना विकी
गप्प बसलेला पाहून आजोबांनी उजळणी केली. ''तगडया
घोडयाला घोडेस्वार काबूत ठेवत होता'', ''मोठया क्रेनला चालक चालवत होता'', आणि ''एवढी मोठी
आग एका छोटया काडीनेच लागली होती'' ह्या सा-यामागचा विचार सांगू शकशील ?
विकी
आता खरोखरीच विचारात पडला होता. आजोबांनी हसत सांगितले,''अरे विकी
ह्या सा-या मोठया गोष्टींवर लहान किंवा छोटया गोष्टी नियंत्रण करीत होत्या.
त्याचप्रमाणे आपल्या विचारांवर आणि तोंडावर काबू ठेवते, ती आपली
जीभ. ह्या जीभेचा म्हणजेच बोलण्याचा वापर आपण विचारपूर्वक केला पाहिजे. प्रत्येक
वेळेला स्पष्टपणे सांगितलेले विचार सांगितले तर समोरचा माणूस दुखावला जाऊ शकतो.
तात्पर्य:- बोलतांना आपल्या जीभेवर आपले नियंत्रण
असावे''.