⚜️म्हातारीची खीर⚜️
एका गावात एक वृद्ध महिला राहत होती, तिच्या
कंजुशीची चर्चा गावभर होती, एका मुलाने तिला याबद्दल अद्दल घडविण्याचे
ठरविले. तो त्या महिलेच्या घरी गेला व तिला तिचा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगू
लागला. तिने त्याला नाते असण्याचे नाकारले. कारण तो तिथे राहिला तर तिला खर्च पडला
असता ना!. बाहेर खूप पाऊस पडत होता. होय नाही करत किमान पावसाचे कारण सांगत त्या
मुलाने तिच्या घरात प्रवेश मिळवला. तिने त्याला घरात प्रवेश तर दिला पण मुलगा काही
खायला मागेल म्हणून ती म्हणाली, माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही, तेंव्हा
गुपचूप पडून राहा. तेंव्हा तो मुलगा म्हणाला, आजी मी तुला
काहीच खायला मागणार नाही कारण माझ्याकडे जादूची छडी आहे. तिच्या सहाय्याने मला काय
पाहिजे ते बनविता येते. तू फक्त मला चूल, पातेले आणि पाणी दे, मी छडीच्या
सहाय्याने आज खीर खाणार आहे. पाहिजे तर तुला पण खायला देतो. महिलेने पण खूप दिवसात
खीर खाल्ली नव्हती. त्याने चुलीवर पातेल्यात पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले.
काही वेळाने आपल्या जवळची छडी काढून त्याने त्या पाण्यातून फिरवली व त्या पाण्याची
चव घेतली व म्हणाला, आजी खीर खूप छान झाली आहे पण यात जर तांदूळ आणि
साखर असती तर ना खूप मज्जा आली असती. महिलेने विचार केला थोडे तांदूळ आणि साखर
दिली तर काय बिघडते. तिने दिले. त्याने थोड्या वेळाने परत अजून दुध, वेलची आणि
सुका मेवा मागितला. महिलेने खिरीच्या लोभापायी तो दिला. खीर तयार झाली. महिलेने व
त्या मुलाने एकत्र बसून खाल्ली. महिलेने हा जादूच्या छडीचा चमत्कार मनाला व मुलाने
कंजूष महिलेच्या घरी खीर खाल्ली.
तात्पर्य:- बुद्धीच्या जोरावर संकटकाळातही आपण आपले
काम सध्या करू शकतो.