⚜️एकमेका सहाय्य करू⚜️

   ⚜️एकमेका सहाय्य करू⚜️

    हा वर्ग आठवा. वर्गात एकंदर पस्तीस विद्यार्थी-विद्यार्थिनी.या वर्गातील विद्यार्थी सर्व कार्यात पुढेच पुढे. ती वर्गसजावट असो वा ग्रामसफाई. वर्गातले कार्यक्रम असोत वा स्नेहसंमेलनातील स्पर्धा. मग त्यात या वर्गातील मुलांचा सहभाग नाही म्हणजे नवलच.
    अभ्यासातही या मुलांनी नंबर सोडला नव्हता. या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत अनेक आपतग्रस्तांना मदत केली होती. पूर, वादळ, वायुग्रस्तांना यथायोग्य सहाय्य केलं होतं. त्यासाठी ते निरनिराळया युक्त्या प्रयुक्त्या लढवित. कधी वर्गातून वर्गणी गोळा करीत तर कधी मुलांचं एखाद नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून निधी एकत्र करीत या कार्यात वर्गाचा वर्गनायक प्रशांत याचा सिंहाचा वाटा असे; त्याला नेहमी प्रोत्साहन आणि सहकार्य मिळायचं ते शाळेच्या मुख्याध्यापकांचं असचं एकदा सर्व शिक्षक व मित्रांना प्रशांतनं फराळाचं आमंत्रण दिलं. घर लहानसच असल्यानं सर्वांची बसण्याची व्यवस्था खालीच केली. पण ती इतकी आकर्षक व स्वच्छ की कुणाचीही नजर एकदम खिळावी. सर्वांनी त्यांचं कौतुक केलं गप्पागोष्टी करीत फराळ झाला.प्रशांतला एक भाऊ होता. त्याचं नाव मनोज. वयानं अगदी दहा बारा वर्षाचा. पण गाण्यात मात्र पहिला नंबर ठेवलेला हे कळताच सा-या विद्यार्थ्यांनी त्याला गाणं म्हणण्याचा आग्रह केला. मनोज आनंदाने तयार झाला. चाचपडत, चाचपडत तो बैठकीत आला. विद्यार्थी आणि शिक्षक आश्चर्याने पाहू लागले. मनोजनं गायला सुरवात केली,
'आई, मी चंद्रावर जाणार तिथे जावूनी आई मी तर खूप मजा करणार, मी चंद्रावर जाणार.' गाणं पूर्ण झालं. साऱ्यांनी टाळया वाजविल्या.
    प्रशांत व त्याची आई यांच्या डोळयातून नकळत अश्रु आले. सरांनाही वाईट वाटलं एवढा मधूर गाणारा मुलगा जो चंद्रावर जावू ईच्छितो तो साधं आपल्या सभोवतीचं जग बघु शकत नाही. आपल्या जन्मदात्या आईचं दर्शन घेऊ शकत नाही. चंद्र कसा आणि कुठे आहे हे ज्याला ठावं नाही तो चंद्रावर जाण्याची ईच्छा बाळगतो. केवढा विरोधाभास. क्षणभर सगळयांना वाईट वाटले. शिक्षकांनी चौकशी केली तेंव्हा कळले की जन्मत:च तो अंधळा आहे. घरी करती सवरती ती आईच. त्यामुळे डोळयाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसा जमत नव्हता. हे सारं कळल्यावर मुख्यध्यापकांना रहावलं नाही. त्यांनी कशाचा तरी मनाशी निश्चय केला. प्रशांत, मनोज आणि त्याची आई यांचा निरोप घेवून ते निघाले.
       दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी वर्ग आठच्या विद्यार्थ्यांची बालसभा घेतली. एखादा उपक्रम राबवून काही रक्कम एकत्र करायची असे सांगितले. वर्ग आठचेच विद्यार्थी ते! अगदी खुषीने तयार! मुख्यध्यापकांनी शिक्षकांतर्फे 5000 रू निधी एकत्र करण्याचे अश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे, रूपये आणून मुख्यध्यापकांजवळ दिले. एक हस्तलिखित निवेदन त्यांनी काढलं. इतर वर्गातूनही निधी जमला. निवेदनाला योग्य प्रतिसाद मिळून अवघ्या दोन तीन दिवसात पुरेसा निधी गोळा झाला. स्वत: मुध्यध्यापक मनोज व त्याच्या आईला घेवून शहरातील एका नेत्रतज्ञाकडे गेले. चाचणीनंतर मनोजच्या डोळयांचं ऑपरेशन अगदी व्यवस्थीत पार पडलं. आठवडयानंतर आज डॉक्टर मनोजच्या डोळयावरील पट्टी काढणार होते. काय आनंद झाला होता त्याला? सहज गंमत म्हणून डॉक्टरांनी त्याला विचारलं, मनोज, तुला आज नविन दृष्टी मिळणार. यानंतर तू सारी सृष्टी बघणार आहेस. पण त्याआधी मला हे सांग सर्वप्रथम तू कुणाला पाहू इच्छितोस? या अनपेक्षित प्रश्नाने मनोज क्षणभर गोंधळला. थोडा विचार करून तो म्हणाला, डॉक्टर साहेब, मी शाळेचे मुख्यध्यापक व दादाचा मित्रपरिवार यांना प्रथम पाहू ईच्छितो. ज्यांनी मला ही दृष्टी मिळवून देण्यास सढळ व निस्वार्थी मदत केली त्या माझ्या मोठया भावांना मी प्रथम पाहू ईच्छितो. त्याला एकदम गहिवरून आलं. डॉक्टरांनी मुख्यध्यापक व काही विद्यार्थ्यांना आत सोडलं. डॉक्टरांनी हळूहळू डोळयावरची पट्टी सोडली. थोडया वेळात मनोजला दिसायला लागलं. त्याने एकदम सर, दादा, आई, अशी हाक मारली. प्रशांतने तर त्याला चक्क मिठीच मारली. त्यांची आई हा सारा प्रसंग डोळे भरून पहात होती. कोण आनंद झाला होता तिला आज! तिचा मनोज पाहू शकत होता. आठवडाभरातच त्याला दवाखान्यातून सुटी मिळीली. तो पेढे घेऊन शाळेत आला. मुख्याध्यापकांना मनोजने वाकून नमस्कार केला. आपल्या चिमुकल्या हाताने त्यांना पेढा दिला. मुलांनी दिलेल्या अल्पशा मदतीतून एका बालकाला दृष्टी मिळाली. त्याची चंद्रावर जाण्याची महत्वकांक्षा तो आता पुर्ण करू शकणार होता.
बाल मित्रांनो, आहे ना आदर्श वर्ग! 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!' हे ब्रीद ज्यांनी अंगिकारलं ते आदर्श झालेच म्हणून समजा!
तात्‍पर्य:- एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.