⚜️ संयमाने वागा⚜️

⚜️ संयमाने वागा⚜️  

“आवत गारी एक है, उलटत होय अनेक ।

कहैं कबीर नहिं उलटिये, वही एक की एक ॥

    कोणी शिवीगाळ केली तर ती येताना एकच असते; पण उलटून आल्यावर अनेक होतात आणि एकापाठोपाठ शिव्यांचा क्रम सुरू होतो. म्हणून कबीर म्हणतात की, शिवीने कुणाला उत्तर देऊ नका.

       भांडणतंटे सुरू झाले की, माणसे एकमेकांना अद्वातद्वा वाटेल तसे बोलतात-शिवीगाळ करतात. एखाद्या माणसाने रागाने शिवी हासडली की, दुसरा लगेच संतापाने बडबडू लागतो व तोही शिवी देतो. अशा तरेने दोन्ही बाजूने परस्परांना दुरुत्तरे, वाईटसाईट बोलणे, कुत्सित टोमणे मारणे सुरू होतात व वाद वाढतच जातात. कोणी थांबायला तयार होत नाहीत म्हणून कबीरदास म्हणतात, येताना शिवी एकटीच असते; पण एकदा सुरू झाली की, परस्पर शिव्यांचा भडिमार सुरू होतो आणि भांडण विकोपाला जाऊन हाणामारीची वेळ येते. एकमेकांच्या पिढ्यांचाही उद्धार होतो. तेव्हा असे होऊ नये म्हणून वेळीच थांबावे. उलट उत्तर देऊ नये म्हणजे ती शिवी एकच एक राहून जाते. शिव्यांची लाखोली वाहण्यापेक्षा संयम ठेवला तर बरे!

तात्पर्य :- शिव्याने नेहमी भांडणे वाढतात म्हणून संयमाने वागावे.