⚜️आत्‍मज्ञान⚜️

  ⚜️आत्‍मज्ञान⚜️

      एक संत वनात कुटी बांधून राहत होते. कंदमुळे खाऊन ते गुजराण करत असत आणि परमेश्‍वराचे चिंतन करत. वनातून जाणारा कोणी त्‍यांची कुटी पाहून थांबत असे. तेव्‍हा ते त्‍याच्‍याशी प्रेमाने बोलत. जे काही जवळ असेल ते त्‍याला खाऊ घालत. एक दिवस एक तरूण त्‍यांना भेटायला आला. त्‍यांच्‍या बोलण्‍याने तो प्रभावित झाला आणि त्‍यांचा शिष्‍य बनून तेथेच राहू लागला. संताने त्‍याला तपश्‍चर्या कशी करतात याविषयी माहिती दिली. शिष्‍याने गुरुच्‍या शिकवणीप्रमाणे वाटचाल सुरु केली. गुरुशिष्‍य स्‍नेहभावनेने राहू लागले. एकदा संत त्‍याला म्‍हणाले,'' मन मोठे चंचल असते, त्‍याला नियंत्रणातच ठेवले पाहिजे. ही गोष्‍ट शिष्‍याच्‍या मनावर ठसली. त्‍या दिवसापासून त्‍याने स्‍वत:ला एका खोलीत बंद करून घेतले. संताने त्‍याला विचारले असता शिष्‍य म्‍हणाला की, तो त्‍याच्‍या मनावर ताबा मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. शिष्‍य रात्रंदिवस खोलीतच राहू लागला. आश्रमात येणा-या जाणा-याकडे तो अजिबात लक्ष देईनासा झाला. एकेदिवशी गुरुने शिष्‍याला खोलीचा दरवाजा उघडावयास सांगितले. 
    गुरु आत आले ते हातात एक वीट घेऊनच. गुरुंनी शिष्‍याला काहीच न बोलता ती वीट एका दगडावर घासायला सुरुवात केली. शिष्‍याने विचारले की, गुरुजी हे काय करताय तुम्‍ही. गुरु म्‍हणाले, या विटेपासून आरसा बनवायचा आहे. 
शिष्‍य म्‍हणाला, गुरुजी असे कसे शक्‍य आहे. 
गुरुजी शांतपणे शिष्‍याला म्‍हणाले,''ज्‍याप्रमाणे विटेचा आरसा बनू शकत नाही तसे मनाचा आरसा बनू शकत नाही. मन तर धूळ आहे जी आत्‍म्‍यावर पडलेली असते. ती धूळ विसरण्‍याचा प्रयत्‍न केला तरच खरेपणा दिसून येतो.'' शिष्‍याला गुरुची शिकवण समजून आली.
तात्पर्य:- चंचल मनाला नियंत्रणात ठेवूनच प्रगती साधता येते.