⚜️असंगाचा संग⚜️
एका गृहस्थाकडे एक बैल होता. तो संध्याकाळी इतर गुरांबरोबर नेहमी वेळेवर घरी जायचा. परंतु एके दिवशी तो घरी न येता दुस-या बैलांबरोबर एका शेजा-याच्या वाडयात निघून गेला. वाडयात शिरल्यावर पोटभर खाऊन मनमुराद नासधूस करून इतर बैल विश्रांती घेत होते व तेथेच थोडा वेळ शांत बसले. इतक्यात वाडयाचा मालक काठी हातात घेऊन धावत आला. तेथील बैलांना नेहमीचीच सवय असल्याकारणाने मालकाला चुकवून ते मार न खाता एकदम पसार झाले.परंतु त्या गरीब बैलाला असली मुळीच सवय नसल्यामुळे कोणत्या बाजूने पळून जावे हे त्याला सुचेना , आणि अखेरीस बराच चोप दिल्यावर मालकाने त्याला जाऊ दिले. मध्यरात्री घरी आल्यावर त्याचा मालक त्याला पाहण्यास आला बैलाच्या पाठीवर वळ त्याच्या दृष्टीस पडले. मालकाने त्या माराचे कारण मनात समजून एक भले मोठे लोढणे त्याच्या गळ्यात अडकवून दिले. जेणेकरून त्याला पळता येईना. अर्थातच त्यानंतर तो कधी दुसर्याच्या वाडयात शिरलाही नाही. सद्गुणी असतानाही एका प्रसंगाने त्याच्या गळ्यात कायमचे लोढणे अडकले.
तात्पर्य :- असंगाचा संग करण्याच्या दोषाने चांगल्या बुद्धीला भ्रम झाला. कुसंगती थोडा वेळ जरी प्राप्त झाली तरी ती अब्रुला हानीकारक होते.