⚜️उतारा वाचन भाग २२⚜️
एक कुत्रा रस्त्याने चालला होता. त्याला रस्त्यावर एक भाकरीचा तुकडा सापडला. भाकरीचा तुकडा तोंडात धरुन तो धावू लागला. तो एका विहिरीजवळ थांबला. कुत्र्याने पाण्यात पाहिले. त्याला पाण्यात एक कुत्रा दिसला. त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा दिसला. कुत्र्याला वाटले, पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा हिसकावून घ्यावा. कुत्रा भुंकू लागला, तोच त्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा पाण्यात पडला. पाण्यात दुसरा कुत्रा नसून ते प्रतिबिंब होते हे कुत्र्याच्या लक्षात आले.
तात्पर्य - अतिलोभामुळे स्वतःचे नुकसान होते.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) रस्त्याने कोण चालले होते ?
२) कुत्र्याला रस्त्यावर काय सापडले ?
३) कुत्र्यास पाण्यात काय दिसले ?
४) कुत्रा कोठे थांबला ?
५) कुत्रा का भुंकू लागला ?
६) कुत्र्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा कोठे पडला ?
७) कुत्र्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा का पडला ?
८) कुत्र्याच्या काय लक्षात आले ?
९) पाण्यातील कुत्र्याच्या तोंडातील भाकरीचा तुकडा कुत्र्यास का मिळाला नाही ?
१०) या गोष्टीतून तुम्हांला काय तात्पर्य मिळते ?
(११) या गोष्टीत कोणत्या प्राण्याचा उल्लेख आला आहे ?
१२) 'पाणी' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.