⚜️कृतघ्न मित्र⚜️
एका जंगलात एक मोठे तळे होते. त्या तळ्याकाठी एक जांभळाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. त्याचे नाव होते दामू. जांभळाच्या दिवसात जांभळे खायची आणि झाडावरच राहायचे असा त्याचा दिनक्रम असायचा. दामूला एकाच गोष्टीचे वाईट वाटायचे. त्याला कुणी मित्र नव्हता. जंगलातील सर्व प्राणी तळ्यावर पाणी प्यायला यायचे. त्या प्राण्यांशी दोस्ती करण्याचा दामू प्रयत्न करायचा; पण कुणीच त्याच्याशी बोलत नसायचे.
तळ्यात काही मगरी राहत होत्या. त्यातील एक मगर एके दिवशी फिरत फिरत जांभळाच्या दिशेला आली. या मगरीचे नाव होते राणू. राणूला मित्र नव्हते; पण त्याचा परिवार होता. दामूसाठी राणू नवीन होता. राणूशी गप्पा माराव्या म्हणून दामूने त्याला आपल्याकडे बोलावले. राणू आला. राणू आणि दामू चांगलेच गप्पा मारू लागले. बऱ्याच वेळानंतर राणू तळ्यातील आपल्या घरी जायला निघाला. दामूने त्याला थोडी जांभळे दिली. राणूला जांभळे गोड लागली.
आता राणू रोज दामूकडे यायला लागला. राणू आला की दामू त्याला गोड गोड जांभळे खायला द्यायचा. मग खालच्या फांदीवर येऊन तो गप्पा मारायचा. दोघं तासंतास गप्पा मारायचे.
एके दिवशी राणू म्हणाला, "तू मला रोज गोड जांभळे खायला देतोस. मी मात्र तुला काही देऊ शकलो नाही. तू माझ्या घरी चल. तेवढीच मला तुझी सेवा करण्याची संधी मिळेल."
"मी जमिनीवर राहतो. मला पाण्यात राहता येत नाही. मी कसा तुझ्या घरी येणार?" दामूने विचारले.
"मी तुला माझ्या पाठीवर घेऊन जाईल. तू नाही म्हणू नको."
राणूने विनंती केल्यावर दामू तयार झाला. झाडावरून उडी मारून राणूच्या पाठीवर बसला. दामूला पाठीवर घेऊन राणू खोल पाण्यातील आपल्या घराकडे निघाला.
बरेच अंतर गेल्यावर राणू दामूला म्हणाला, "मित्रा, मी तुला जेवणासाठी नेत नाही तर ठार मारण्यासाठी नेत आहे. तू दिलेली जांभळे माझ्या पत्नीने खाल्ली. तिला ती आवडली. रोज जांभळं खाल्ल्यामुळे तुझे हृदय तर जांभळाहून गोड झाले असणार. माझ्या पत्नीला तुझे हृदय खायचे आहे. त्यासाठी मी तुला नेत आहे."
हे ऐकताच दामू घाबरला. पळून जाणे शक्य नव्हते. जीव वाचविण्यासाठी काही तरी युक्ती करायला हवी म्हणून तो विचार करू लागला. जरा वेळाने तो राणूला म्हणाला, "मित्रा, तुझ्या पत्नीला माझे हृदय हवे हे आधीच का सांगितले नाही. आता मला नेऊन तुझा काहीच फायदा होणार नाही. कारण मी माझे हृदय जांभळाच्या झाडावर एका ढोलीत दडवून ठेवले आहे."
हे ऐकल्यावर निराश होऊन राणू परत फिरला. दामूला पाठीवर घेऊन तो वेगात जांभळाच्या दिशेने निघाला.
जांभळाचे झाड दिसताच दामूच्या जीवात “जीव आला. त्याने वेगात उडी मारून जांभळाची फांदी धरली आणि सरसर चढत वर जाऊन बसला.
तात्पर्य:- अगदी जीवावर बेतले तरी घाबरून न जाता युक्तीचा वापर करावा.”