⚜️उतारा वाचन भाग ३२⚜️
शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता. एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले. तेव्हा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करुन शंकरला कमी साखर दिली. शंकरने हुज्जत घातली, पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही. वडीलांनीही आरोप केला, 'वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली. 'शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली. खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे, असे त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले. हाच शंकर पुढे शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिध्द झाला. डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म २९ एप्रिल, १८६७ रोजी मुंबईत झाला. तो काळ पारतंत्र्याचा होता. त्या काळी प्रत्येक भारतीय माणसाला कमी लेखले जाई. शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबात स्थान नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुढे डॉ. भिसे शास्त्रज्ञ म्हणून नावारुपाला आले.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) मुलाचे नाव काय होते ?
२) शंकरला कमी साखर कोणी दिली ?
३) शंकरला दुकानातून काय आणायला सांगितले ?
४) शंकरवर वडिलांनी काय आरोप केला ?
५) शंकरने दुकानदाराशी हुज्जत का घातली ?
६) शंकरच्या मनात काय घोळत राहिले ?
७) प्रसिध्द वैज्ञानिक कोण झाले ?
८) शंकरचे पूर्ण नाव काय होते ?
९) शंकर भिसे यांचा जन्म कधी व कोठे झाला ?
१०) कोणत्या क्षेत्रात भारतीयांना अजिबात स्थान नव्हते.
११) कोणाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखले जाई ?
१२) 'हुज्जत घालणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
१३) तुम्हांला माहित असलेल्या शास्त्रज्ञांची नावे सांगा.
१४) 'पारतंत्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांग.
१५) 'प्रतिकूल' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांग.