⚜️उतारा वाचन भाग ५०⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ५०⚜️

   अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. माणूस एक वेळ अन्नावाचून जगू शकेल, पण पाण्याविना जगणे केवळ अशक्य आहे. उगीचच का पाण्याला जीवन म्हणतात.हवा,पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी ही गोष्ट जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या सोडवण्याला अग्रक्रमांक दयावा लागतो. खेड्यापाड्यातून ही समस्या फारच बिकट आहे. शहरात ठराविक वेळी पाणी येत असेल, तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरुन ठेवता येते. पण खेड्यांपाड्यांतील लोकांना घडाभर पाण्यासाठी मैलोन् मैल चालत जावे लागते. पिण्याच्या पाण्याप्रमाणेच शेतीसाठी व वनश्रीसाठी आपल्या ला पाण्याची गरज आहे. यासाठी 'पाणी अडवा पाणी जिरवा' ही - योजना युद्धपातळीवर राबवायला हवी.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत ?
२) पाण्याला जीवन का म्हणतात ?
३) मानवाला कशाशिवाय जगणे अशक्य आहे ?
४) निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी कोणती ?
५) कोणती गोष्ट जीवनावश्यक आहे ?
६) पाणी टंचाईची समस्या कोठे बिकट आहे ?
७) आपल्याला पाण्याची गरज कशासाठी असते ?
८) पाण्यासंदर्भात कोणती योजना युद्धपातळीवर राबवायला हवी ?
९) खेड्यातील लोकांना पाणी टंचाईला कसे सामोरे जावे लागते ?
१०) अग्रक्रमाने कोणती समस्या सोडवायला हवी ?