⚜️श्रद्धा⚜️
सहदेव महाराजांच्या मठात एक थकला भागलेला तरुण आला. महाराजांना म्हणाला, “महाराज माझा उद्धार करा. मी पापी आहे. मी नीच आहे" महाराज म्हणाले "त्यात काय? मी सुद्धा तुझ्यांइतकाच पापी आहे. नीच आहे.” तो तरुण म्हणाला, “नाही महाराज, तुम्हांला माझ्या पापांची कल्पना नाही. मी अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. दरोडे घातले आहेत.” महाराज म्हणाले, “तू तर माझाच अनुभव सांगत आहेस." यावर तो तरुण म्हणाला. "कसं सांगू महाराज! मी अनेक लोकांचा काटा काढला आहे. त्यांची जीवनयात्रा अर्ध्यावरच संपविली आहे. झोपेतही मला त्या साऱ्यांचे आवाज ऐकू येतात. रात्र रात्र मला झोप येत नाही.” महाराज म्हणाले “अरे वा ! तुझा माझा अनुभव सारखाच आहे. मीसुद्धा हे सार केलंय" एवढं ऐकलं आणि तो तरुण ताड् ताड् निघून गेला. हे सारं पाहणारा पांडुरंग महाराजांना म्हणाला, का त्याला खोटं सांगितलं तुम्ही? अशानं त्याची तुमच्यावरील श्रद्धा ढळणार नाही का?" तेव्हा महाराज म्हणाले, “चालेल, पण त्याची स्वतःवर तरी श्रद्धा बसेल. इतकी पापे करून मी साधू बनू शकतो तर आपण का साधू बनू शकत नाही? असे वाटून तो पळाला. ठीकच झाले”.
तात्पर्य :- माणसाची स्वतःवरील श्रद्धा वाढीस लागली की उद्धार ठरलेलाच!