⚜️उतारा वाचन भाग ७२⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ७२⚜️

     एका गावात एक मेंढपाळ राहत होता. त्याच्याजवळ पुष्कळ मेंढ्या व बकऱ्या होत्या. तो रोज त्यांना रानावनात चरायला घेऊन जाई. असाच तो एकदा लांब रानावनात गेला.त्याच्या कळपात एक लहान बकरी होती. ती होती मोठी खोडकर व चतुर. कळपाबरोबर न राहता ती आडबाजूला गेली. चरता चरता तेथेच रमली. दिवस मावळला. अंधार पडू लागला. मग तिच्या लक्षात आले, कि आपण एकटेच मागे राहिलो आहोत.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) एका गावात कोण राहत होता ?
२) मेंढपाळाजवळ पुष्कळ काय होत्या ?
३) मेंढपाळ मेंढ्यांना रोज कोठे घेऊन जाई ?
४) एकदा लांब रानावनात कोण गेले ? 
५) लहान बकरी कोणाच्या कळपात होती?
६) लहान बकरी कशी होती ?
७) चरता चरता कोण रमले ? 
८) बकरीच्या काय लक्षात आले ? 
९) आपण एकटेच मागे राहिलो आहोत, हे बकरीच्या केव्हा लक्षात आले ? 
१०) 'मेंढपाळ' कोणाला म्हणतात ?
११) 'पुष्कळ' या शब्दाला आणखी समानार्थी शब्द सांग.
१२)'एका गावात एक मेंढपाळ राहात होता.' या वाक्यातील क्रियापद सांग.
१३) 'तो रोज त्यांना रानावनात चरायला घेऊन जाई.' या वाक्यातील सर्वनाम शोध.
 १४) 'ती होती मोठी चतुर आणि खोडकर' या वाक्यातील विशेषणे सांग.
१५) 'मेंढी' या शब्दाचे अनेकवचन लिही.