⚜️रागावरील उपाय ⚜️

 ⚜️रागावरील उपाय ⚜️ 

    बंकेई नावाच्या एका गुरूकडे एकजण गेला आणि म्हणाला, मला फार राग येतो, त्यावर काहीतरी उपाय सांगा. बंकेई म्हणाले, एकदम सोपी गोष्ट आहे. राग आला की धावत माझ्याकडे यायचं. 
    एकदा तो धावत आला बंकेईकडे. बंकेई म्हणाले, हां, आता दाखव तुझा राग कुठे आहे तो? तो म्हणाला, इकडे धावत येईपर्यंत तो गेला. बंकेई म्हणाले, अर्रर्र, घोटाळा झाला. रागावर उपाय करायचा, तर तो असला पाहिजे ना. हरकत नाही. पुढच्या वेळेला राग आला की ये. असं दोनचार वेळा झालं. राग आला की तो धावत यायचा. बंकेईंना भेटेपर्यंत राग निघून जायचा. 
मग बंकेईंनी एक दिवस त्याला समोर बसवून सांगितलं, आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या उपक्रमातून आपल्याला काय कळलं? राग हा काही तुझ्या आत नाहीये, तो बाहेरून येतो आणि बाहेर निघून जातो, बरोबर? तो माणूस म्हणाला, बरोबर. बंकेई म्हणाले, शिवाय तो आल्यावर त्याला काही करायला गेलं की तो त्यात गायब होतो, बरोबर? तो माणूस म्हणाला, बरोबर. बंकेई म्हणाले, जेव्हा तो येतो, तेव्हा तो तुझ्या शरीराचा ताबा घेतो. तुझ्याकडून मारहाण, आरडाओरडा असे अनेक प्रकार करून घेतो. बरोबर?  तो माणूस म्हणाला, बरोबर. 
बंकेई म्हणाले, मग आता एकच उपाय आहे. एक काठी घ्यायची. आपल्याला राग आला रे आला की स्वत:ला काठीने झोडपून काढायचं. बघ, त्या रागावर तुझ्या रागाची अशी दहशत बसेल की पुन्हा तुला कधीही राग यायचा नाही.

तात्पर्यः- राग हा क्षणीक असतो.त्याने माणसाचे नुकसानच होते.म्हणून राग आल्यावर शांत बसून मौन पाळणे हे सर्वांच्याच हिताचे राहील.