⚜️राक्षसी प्रवृत्त्ती⚜️

 ⚜️राक्षसी प्रवृत्त्ती⚜️

     एक राक्षस होता. त्‍याला आपल्‍या सर्व कामासाठी एका माणसाची गरज होती. त्‍याने शोधाशोध करून एका माणसाची नियुक्ती केली. तो माणूस खूप सज्जन होता. राक्षस सांगेल ते कोणतेही काम तो पूर्ण करत असे. तो अविरत काम करत असे. मात्र राक्षस आपली वाईट प्रवृत्ती दाखवून द्यायचाच. तो त्‍याला सतत धमकावत असे. कामात त्‍याला विलंब झालेला चालत नसे. माणसाने जरा जरी कामात विलंब केला तरी मी तुला मारून टाकीन असे धमकी वजा राक्षस बोलत असे. माणूस राक्षसाच्‍या भीतीने घाबरून आणखी वेगाने काम करत असे. माणूस विचार करायचा की आपण जर काम नीट केले नाही तर आपल्‍याला हा राक्षस मारून तर टाकायचा नाही ना. एकेदिवशी सकाळपासून संध्‍याकाळपर्यंत तो सतत काम करत होता. तो इतका थकला होता की त्‍याला सुस्‍ती येऊ लागली. त्‍याला एक पाऊलही टाकवेना. थोड्या वेळाने राक्षस आला. माणसाला बसलेला पाहून राक्षस ओरडला,’’ तुझी अशी रिकामे बसून राहण्‍याची हिंमत झालीच कशी, चल उठ कामाला लाग नाही तर मी तुला खाऊन टाकीन.’’ राक्षसाच्‍या धमकीने माणूस घाबरला. त्‍याच्‍या मनात विचार आला की तू माणूस आहे व तो राक्षस आहे. धमकाविणे हे त्‍याचे काम आहे. तू जोपर्यंत याला घाबरशील तोपर्यंत हा तुला घाबरवत राहणार. एकदा का होईना याला प्रत्‍युत्तर दिलेच पाहिजे. शेवटी माणसाने मनाची तयारी केली. आता जे होईल ते होईल पण याला उत्तर हे द्यायलाच हवे हा पुरुषार्थ त्‍याच्‍या मनात जागृत झाला व तो राक्षसाला म्‍हणाला,’’ सारखे सारखे खाऊन टाकण्‍याची भाषा कशाला करतोस, खायचे असेल तर मला खाऊन टाक म्‍हणजे मी पण एकदाचा सुटलो.’’ त्‍याची ही हिंमत पाहून राक्षसाने आपले वागणे बदलले.

   तात्पर्य :- रोजच्या जीवनातही बरेच राक्षस घाबरवत असतातच पण त्यांना किती किंमत द्यायची हे आपणच ठर वायचे असते. ज्या दिवशी आपल्यातील भीती सोडून आपण चालु तेव्हा ही राक्षसी प्रवुत्ती आपोआप गप्प बसते.