⚜️मूर्ख गाढव⚜️
एकदा एक गाढव जंगलात चरण्यासाठी गेलं. चरता चरता थोड्या अंतरावर त्याला एक सिंह मरून पडलेला दिसला. तो त्या सिंहाजवळ गेला. त्याला पाहिल्यावर गाढवाला एक कल्पना सुचली. त्याने त्या सिंहाचे कातडे स्वतःच्या अंगावर पांघरले. आणि तो चालू लागला. जंगलातून चालत जात असताना सर्व प्राणी त्याला पाहून घाबरून पळून जाऊ लागले. ते पाहून त्या गाढवाला गंमत वाटली. त्याची हिंमत अधिकच वाढली.
ते गाढव मग गावात शिरले. त्याला सिंह समजून गावातली लोकसुद्धा घाबरून पळू लागली. नेहमी मला मारणारी लोक आज सिंहाच्या रुपात मला पाहून पळत आहेत. याची गंमत वाटून ते गाढव सर्वांना घाबरवू लागले. एक दिवशी मात्र ते शेतातून हिंडत असताना दुसरे एक गाढव त्याच्यासमोर आले. त्याला पाहून गाढवाला आनंद झाला. दुसऱ्या गाढवाला प्रतिसाद देण्यासाठी सिंहाची कातडी पांघरलेले गाढव जोरजोरात ओरडू लागले. बाजूला काही शेतकरी उभे होते. हा सिंह नसून सिंहाची कातडी पांघरलेले गाढव आहे हे त्या शेतकऱ्यांच्या लगेच लक्षात आले आणि मग त्यांनी हातातल्या काठीने त्या गाढवास भरपूर बदडून काढले. गाढवाने जो सोंग घ्यायचा मूर्खपणा केला होता, त्याची त्याला शिक्षा मिळाली.
तात्पर्य :- कधी कोणाचं खोटं रूप घेऊन ढोंग करू नये.