⚜️झऱ्याचा स्वर‌⚜️

⚜️झऱ्याचा स्वर‌⚜️

     एक होता स्वर. सुरूवातीला तो खुप सुंदर गाणे गायचा. नंतर तो गाऊन गाऊन दमला. एका झ-याच्या जवळ आला. तो झरा खूप निर्मळ होता. त्याचे पाणी स्वच्छ आणि अमृतासरखे होते. त्या झर्‍यामुळे सर्वसृष्टी बहरल्यागत दिसत होती. तहान भागेपर्यंत त्या स्वराने खूप खूप पाणी प्यायले. ते पाणी पिल्या नंतर स्वराचा आवाज पहिल्यापेक्षा मधूर झाला. तो आपल्या मधूर आवाजात गाऊ लागला. त्याच्या आवाजाने त्या सृष्टीत जणू एक एक व्याक्तीत्व उतरले असावेत. तिकडे सर्वजणं गात होते. तो झरा... ती पाने-फुले... ते पक्षी... मग झ-याने त्या स्वराला सांगितले, 'हे स्वरा, तू जेव्हा जेव्हा माझ्याजवळ येशील तेव्हा तेव्हा तुला एक उत्सफूर्तता येईल गाणे गायला. आणि तुझ्या माधुर्याच्या रसात सर्वजणं न्हाऊन निघतील. माझ्यातलं अमृत तुला पावन करेल. ते जीवन आहे सर्वांच आणि हया सर्वांचं.
      एके दिवशी स्वराच्या माधुर्याची किर्ती एका राजाला कळली. त्याने त्याला आपल्या राजमहालात 'राज कवी'चा दर्जा दिला. राजवाडयाच्या मोहात तो आपल्या झऱ्याला आणि सृष्टिला विसरून गेला होता. आणि मग तो त्या राजवाडयात मोठया दिमाखाने राहू लागला. तिकडे झरा, झाडे, पाने-फुले, पक्षी शांत झाले त्यांच्यातले सौंदर्यच जणू निघून गेले, झ-याचे पाणीच संपले, पाने-फुले वाळली, सर्वत्र उदास भकास वातावरण होते. इकडे दिवसेन दिवस स्वराचा आवाज खराब होऊ लागला. मग अचानक स्वराला स्वप्न पडले की, त्याचा झरा पार सुकून गेला.. आणि त्याला वाचवण्यासाठी स्वराला तिकडे असणं गरजेचं आहे. तो चटकन उठला आपल्या राजमहालाला सोडून तो आपल्या झ-याजवळ आला..... आणि त्या झ-याचे विशिण्ण रूप पाहून झ-याला खूप रडू येऊ लागले. त्या अश्रूंचे थेंब त्या झ-यात पडले. आणि झरा थोडा सावरला, मग स्वर आपल्या स्वरात आपण केलेल्या चूक सावरून आपल्या झ-याकडे आल्याचे एक मधूर गाणे गाऊ लागला. त्याचा तो मधूर आवाज पाने-फुले, झडे, पक्षी यांना स्पर्शून गेला. आणि सर्वजणं जागी झाली. ती पण त्याचं सांत्वन करू लागली. मग आनंदाच्या अश्रूंचा पूर आला आणि तो झरा, तो स्वर, ती सृष्टी आजही तिकडे अशीच आहेत. निरंतर सर्वांना सुख देतात... कारण स्वराचे अस्तित्व झ-यात आहे आणि झ-याचे अस्तित्व स्वरात आहे....

तात्‍पर्य:- झ-याशिवाय स्वर नाही आणि स्वराशिवाय झरा नाही.