⚜️कसा ?⚜️

⚜️कसा ?⚜️

कोकीळ म्हणतो काय करावे 
खोकून बसला पार घसा 
कुहु कुहुची मंजुळ गाणी 
सांगा आता गाऊ कसा
सांगा आता गाऊ कसा (१)

कुत्रा म्हणतो उडी मारुनी 
पकडू गेलो एक ससा 
ससा पळाला पाय मोडला 
चोरामागे धावू कसा
चोरामागे धावू कसा (२)

म्हणे कोंबडा टीव्ही बघता 
रात्री गेला वेळ असा 
उशीरा उठलो कुकुचकू ची 
हाक कुणा मी देऊ कसा 
हाक कुणा मी देऊ कसा (३)

बोका म्हणतो चष्म्यावाचून 
आंधळाच मी भरदिवसा 
बिळात सरकन् पळून गेला
 उंदीर कोठे शोधू कसा
उंदीर कोठे शोधू कसा (४)