⚜️हुशार कासव⚜️
जंगलात अनेक प्राणी राहत होते. त्यात एक हुशार कासवही होते. एक दिवस जंगलात इकडे तिकडे फिरत असताना काही शिकारी त्याच्याजवळ आले आणि त्यांनी कासवाला पकडले. कासवाला शिजवून खाऊन मेजवानी करण्याचा बेत होता. त्यावर एकजण म्हणाला," आपण प्रथम कासवाची पाठ फोडून काढून टाकू. मग त्याला शिजवून खाता येईल."त्यावर कासव म्हणाले, "आधी मला मारुन मग माझी पाठ वेगळी करुन माझं मांस शिजवून तुम्हांला खाता येईल. "शिकाऱ्यांना ते पटले. त्यांनी कासवाच्या पाठीवर काठ्यांनी मारायला सुरूवात केली. कासवाने आपली मान आत घेऊन टणक पाठीवर घाव घेत आपल्या शरीराचे रक्षण केले. शेवटी मारुन शिकारी दमले. पण कासवाचा जीव जाईना. मग कासवानेच त्यांना कल्पना सुचवली की, " समोरच्या तळ्यात मला तुम्ही बुडवा, पाण्यात बुडून माझा जीव गेला की मी तरंगत काठावर येईन. मग मला शिजवून खा." त्या शिकाऱ्यांना ही कल्पना फारच आवडली. त्यांनी कासवाला उचलून पाण्यात टाकले. पाण्यात गेल्याबरोबर कासव आनंदाने त्यांना म्हणाले, "पाण्याइतकी सुरक्षित जागा माझ्यासाठी कुठलीच नाही . मला पाण्यात टाकून तुम्हीच माझा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद ! "
तात्पर्य :- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.