⚜️अहंकाराची चादर⚜️
रामकृष्ण परमहंस यांचे अनेक शिष्य होते. परमहंस हे अनेकवेळा अध्यात्मिक मार्गातील आपले अनुभव शिष्यांना सांगत असत.जेणेकरुन या मार्गावरुन जाताना शिष्यांना प्रगती करणे सोपे जावे. अतिशय साधी सोपी उदाहरणे देऊन तत्त्वज्ञान तृ सहजपणे उलगडून सांगत.
एकदा प्रवचन देताना ते म्हणाले, "आता मी तुमच्यासमोर बसलो आहे. तुम्ही समोरासमोर प्रत्यक्ष मला पाहत आहात.पण एखादी चादर तुमच्या माझ्यामध्ये धरली तर मी तुम्हांला दिसणार नाही. मी पूर्वी ज्या जागेवर होतो तेथे आत्ताही आहे. परंतु हि चादर मध्ये आल्यामुळे मी तुमच्या दृष्टीस पडत नाही म्हणजे तुमच्या दृष्टीने माझं इथं अस्तित्व नाही. कारण मी तुम्हांला दिसत नाही. तसाच परमेश्वर सुद्धा तुमच्या माझ्या आसपास, जवळ असतो पण आपण स्वतः 'मी'च्या गर्वाने फुलून गेल्यामुळे, अहंकाराच्या धरलेल्या चादरीमुळे आपणाला परमेश्वर दिसू शकत नाही.इतकचं काय छोटासा कापडाचा तुकडा जरी डोळ्यासमोर धरला तरी आजुबाजुचे काहीच दिसत नाही.
तात्पर्य:- गर्व आणि अहंकाराची चादर जोपर्यंत मनातून दूर करत नाही तोपर्यत साक्षात्कार कसा होईल.