⚜️आयुष्य कठीण अजिबात नसतं . . !! ⚜️

 ⚜️आयुष्य कठीण अजिबात नसतं . . !! ⚜️

  • कधी नळाला पाणी नसतं. कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं.  
  • कधी पगार झालेला नसतो. कधी झालेला पगार उरलेला नसतो. कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो. 
  • कधी जागा नसते. कधी जागा असून स्पेस नसते. कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते.
  • कधी डब्यात आवडती भाजी नसते. कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते. दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते. 
  • कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो. कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्यासारखे वाटते. 
  • कधी काही शब्द कानावर पडतात. कधी नको ते शब्द कानावर आदळतात.
  • कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात. 
  • कधी आपण कसे वागायचे समजत नाही. कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही. 
  • कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही. कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही. 
  • कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही. कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही.   
  • कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही. 
  • कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटू लागतो. कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो.
  • कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो. 
       यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ? ताण घेतला तर तणाव. आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याच काय म्हणून चिंता  आयुष्य कठीण करते.   आपण नदी सारखं जगावं. सतत वहात रहावं  या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं .