⚜️लाडूची चोरी⚜️
पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहेसे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुस-या मुलाच्या हाती दिला, त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरूणांना म्हणाला,''तुम्ही दोघेचजण इथे आहात तेव्हा तुम्हां दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे.''
यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरूण म्हणाला,''देवाशप्पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.'' ज्याच्या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्हणाला,'' देवाशप्पथ खरंच सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही.'' दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही.
तात्पर्य:- भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो.