⚜️मावशी⚜️
मावशी या नात्याला वय नसतं. अगदी लहान वयात देखील आपण मावशी होऊ शकतो! आपण सहजपणे आईच्या मैत्रिणीला मावशी म्हणतो पण मैत्रिणीच्या आईला काकू म्हणतो! कुठल्याही स्त्रीला "काकू" म्हणले, तर "माझे काय वय झालेय का?" अशी प्रतिक्रिया येऊ शकते, पण मावशी म्हणले, तर सहसा कोणाला राग येत नाही. आणि येईल तरी कसा? आपण शाळकरी असताना मोठ्या बहिणीला मुलगा /मुलगी झाली असेल तर पहिल्याच दिवशी "तू मावशी झालीस" हा 'किताब मिळालेला असतो. आणि मग त्या इवल्याशा जीवकडे बघून मन भरून येते.
"तुझी मावशी आहे मी!" असे तिने कदाचित दोन वेण्या घालून म्हणलेले असते. आणि मग त्या दिवसापासून आईच्या बरोबरीने जर कोणी माया लावली असेल, काळजी घेतली असेल, तर ती मावशी आणि फक्त मावशीच असते.
आपल्या लहानपणीच्या राज्यात तिचे महत्वाचे स्थान असते. आपण मोठे होतो, तशी तीही दोन वेण्यातून एका वेणीत येते! आणि मग त्या वेणीत गजरा माळणारे कोणीतरी तिच्या आयुष्यात येते. काळानुरूप तीही आई होते, पण म्हणून तिची आपल्यावरची माया कधीच कमी होत नाही.
आपल्या वाढदिवसाला मिळालेल्या भेटवस्तूमध्ये सर्वात वेगळी आणि आवडलेली भेटवस्तू मावशीने दिलेली असते. उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी असेल, तेव्हा मावशीकडे राहायला जाणे हे मोठे आकर्षण!
का कोणास ठाऊक, पण दोन बहिणींच्या शिस्तीच्या कल्पना कायम परस्परविरोधी असतात, त्यामुळे त्यांची मुले एकमेकांच्या घरी गेली की, अतिशय आनंदात असतात.
मावशी जर आईची लहान बहीण असेल,... भाच्यांना तर ती आईपेक्षा मॉडर्न किंवा मोकळ्या विचारांची वाटते. अन जर मावशी मोठी बहीण असेल, तर भाच्यांना ती जास्त शांत आणि प्रगल्भ वाटते. काहीही असो... पण ते नाते मात्र खास असते. नकळतपणे सर्व भाचरांना मावशी रोल मॉडेल वाटते.
तिची फॅशन, कपड्याची स्टाईल, केसांची ठेवण, तिच्या हातचा एखादा पदार्थ... मनात कुठेतरी मोठे स्थान असते त्याचे. जिच्यात आईचा भास असतो, हिंदीत म्हणायचे झाले तर माँ के जैसी, ती मा-सी! बरेचदा आईला एखादी गोष्ट पटवायला मावशीच मदतीला येते. "तू सांग ना तिला! ती आमचे नाही पण तुझे ऐकते" ही मखलाशी हमखास कामी येते.
मावशीशी एक सुंदर भावनिक नाते असते. अशी काही नाती असतात, जिथे आपण आत्ता असे का वागतोय याचा खुलासा करायची गरज पडत नाही, त्या नात्यात एक महत्वाचे नाते हे मावशीचे नाते असते. आपल्याकडे "माय मरो मावशी उरो" अशी एक अजब म्हण आहे. तिचा अर्थ असा नाही की, आईची काही किंमत नाही. तिचा अर्थ असा की, आईनंतर तिची जागा जरी कोणी भरून काढू शकत नसले, तरी तेवढेच प्रेम देणारी एक व्यक्ती असते ती म्हणजे तीच, आपल्याला न्हाऊ माखू घालणारी, आपले लाड करणारी, आपल्यासाठी एक चॉकलेट पर्समध्ये ठेवणारी, आपल्याला आवडती पुस्तके देणारी आणि आपण सासरी जाताना कोणाला न दिसेल अश्या ठिकाणी जाऊन अश्रूंना वाट करून देणारी, मावशी.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421