⚜️माणुसकी⚜️

⚜️माणुसकी⚜️

    संस्‍कृतचे महा‍कवी माघ निर्धन असले तरी मदत करण्‍यास कधीच कमी पडत नसत. त्‍यांच्‍याकडून जितकी मदत गरजूला होत असे तितकी मदत करण्‍यास सदैव तयार असत. एकदा क‍वीराज माघ आपल्‍या घरी शिशुपाल वध या महाकाव्‍याचा नववा अध्‍याय लिहीत असताना दरवाजावर कोणाची तरी हाक ऐकू आली. कोणी हाक मारली हे पाहण्‍यासाठी ते गेले असता त्‍यांना दारावर त्‍यांच्‍याच गावातील एक गरीब व्‍यक्ती उभारलेली दिसली.
      त्‍यांनी त्‍या माणसाला आदराने घरात बोलावले. त्‍याचे योग्‍य ते आदरातिथ्‍य केले व येण्‍याचे प्रयोजन विचारले असता तो गरीब माणूस म्‍हणाला,'' कविराज मी मोठी आशा ठेवून आपल्‍याकडे आलो आहे. माझ्या मुलीचा विवाह ठरला असून त्‍यासाठी मला धनाची गरज आहे. माझी परिस्थिती तर आपण जाणून आहातच. तरी आपल्‍याकडून मला जी मदत होईल ती माझ्यादृष्‍टीने खूप मोठी असणार आहे.'' महाकवींकडेही आर्थिक चणचण होती. परंतु दारी मदत मागायला आलेल्‍या माणसाला परत पाठविणे त्‍यांना योग्‍य वाटेना.
     घरात सगळीकडे शोध घेतला पण त्‍यांना त्‍या माणसाला देण्‍याजोगे काहीच मिळेना. शिवाय दानवीर माणसाच्‍या घरात मौल्‍यवान असे काय शिल्‍लक राहणार. जे होते ते त्‍यांनी लोकांना देऊन टाकले होते. शेवटी महा‍कवींचे लक्ष पत्‍नीच्‍या हाताकडे गेले. पत्‍नीच्‍या हातात सोन्‍यांचे कंकण होते. त्‍यांनी एका हातातील कंकण काढून घेतले व त्‍या गरीब माणसाला देऊन टाकले.
    गरीब माणसाने महा‍कवींचे आभार मानून तो बाहेर पडणार इतक्‍यात कविराजांच्‍या पत्‍नीने त्‍या माणसाला परत बोलावले व आपल्‍या हातातील दुसरे कंकणही त्‍याला दिले व म्‍हणाली, ''मुलीच्‍या लग्‍नात एकच कंकण कसे तिला देणार तिला रिकाम्‍या हाताने पाठवू नकोस.'' या दांपत्‍याच्‍या दानी वृत्तीला गरीबाने साष्‍टांग नमस्‍कार केला.
तात्पर्य : - आपली परिस्थिती नसतानाही दुस-याला मदत करणे हीच खरी माणुसकी.