⚜️समस्या आणि सामर्थ्य⚜️
कोणे एके काळी, एका खेडेगावात एक शेतकरी राहत होता, जो त्याच्याच मोठ्या शेतात काम करत असे. त्याच्या शेताच्या मध्यभागी, जमिनीत एक खडक रुतून बसला होता, ज्यामुळे त्या शेतकऱ्याला शेतात काम करताना अडथळा निर्माण होत असे.
शेतकरी त्या खडकाच्या बाजूने सावधपणे काम करत असे, पण बऱ्याचदा असे घडे की त्या दगडाला ठेच लागून त्याचा तोल जाऊन तो पडत असे. शेतकरी जेंव्हा जेंव्हा पडत असे, तेव्हा तो ठरवत असे, की उद्याच्या उद्या आपल्या शेतातील हा खडक काढून टाकावा. पण मग त्याचे मन ह्या विचाराने बदलत असे, की माहित नाही, हा खडक जमिनीत किती खोलवर रुतला असेल... त्याला वाटत असे की तो एकटाच, हा दगड बाहेर काढू शकणार नाही आणि तो दगड काढण्यास बराच वेळ ही लागेल. असा विचार करूनच, त्याने तो खडक तसाच ठेवला होता.
नेहमीप्रमाणे एके दिवशी सकाळी तो शेतकरी त्याच्या शेतात कामाला गेला, पण नंतर तोच प्रकार घडला. त्या शेतकऱ्याचा पाय त्या खडकावर आपटला आणि ठेच लागून तो खाली पडला. त्याला ठेच लागून पडल्यामुळे त्याची अवजारं ही तुटली. शेतकऱ्याला खूप राग आला, कारण वर्षानुवर्षे त्या खडकाला अडखळून पडल्यामुळे, अनेकवेळा त्याला त्याच्या अवजारांचे नुकसान सहन करावे लागले होते. यावेळी त्याने ठरवले, की आता तो खडक जमिनीतून खणून काढायचा आणि आपल्या शेतातून बाहेर फेकूनच द्यायचा. तो तडक गावात गेला आणि 4 ते 5 लोकांना, अवजारांसहित खडक काढण्यासाठी बरोबर घेऊन आला. जेव्हा शेतकरी त्या खडकाजवळ पोहोचला, तेव्हा त्याने सोबत असलेल्या लोकांना मदत करण्यास सांगितले, "मित्रांनो, तुम्ही हा खडक बघत आहात ना, याने माझे खूप नुकसान केले आहे आणि आज आपण हा खडक बाहेर खणून काढू व त्याला शेतातून बाहेर फेकून देऊ." असे म्हणत शेतकऱ्याने, कुदळ घेतली आणि खडकाभोवती खणण्यास सुरुवात केली. त्या खडकाच्या आजूबाजूची माती खणण्यासाठी त्याने कुदळीने २-३ घाव घातले आणि लगेचच पूर्ण खडकच जमिनीतून बाहेर आला. हे पाहून आजूबाजूचे लोक हसले आणि त्यातील एकजण त्याला म्हणाला, “हे काय भाऊ? तू तर म्हणायचास की तुझ्या शेतात एक खुप मोठा खडक रुतला आहे, पण हा तर फक्त एक मोठा दगड आहे जो जमिनीत वरच्यावर दबला गेला होता. तू एकटाच तो काढू शकला असतास."
शेतकर्यालाही हे पाहून आश्चर्य वाटले की इतकी वर्षे तो विचार करत होता, की इथे एक मोठा खडक जमिनीत खोलवर रुतला आहे, पण आज त्याच्या लक्षात आले, की तो एक मोठा दगड होता, जो जमिनीत वरच्यावर दबला गेला होता आणि तो त्याला सहजपणे काढू शकला असता. त्यानी तो दगड जर आधी काढायचा प्रयत्न केला असता, तर एवढी वर्षे इतका त्रास सहन करावा लागला नसता याची त्याला खंत वाटत होती! पूर्वाग्रह म्हणजे काय? समोर जे आहे फक्त तेच पहा! पूर्वकल्पना करून शहानिशा करू नका. आपण कुठलाही विचार करत असताना, जर आपल्या दृष्टिकोनात नाविन्य नसेल, तर आपण चुकू शकतो. पूर्वाग्रहामुळे, चुकीचा समज निर्माण होतो आणि त्यामुळे आपण आपल्या मनात भीती निर्माण होईल अशा कल्पनेचा वापर करतो म्हणजेच खोटे तथ्यही खरे वाटू लागते. आणि या भीतीपोटीच शेतकरी सुद्धा टाळाटाळ करण्याच्या सवयीत अडकून राहिला होता.
तात्पर्य:- समस्यांना सहन करण्याच्या आणि त्यांना हाताळण्याच्या क्षमतेतूनच सामर्थ्य निर्माण होते.