⚜️मुलीच्या संसारात किती नाक खुपसायचं....⚜️
मुलीच्या संसारात किती नाक खुपसायचं, हे कळायला हवं -डी.पी.एस.बी सागर
"तू मला वेळीच समजावलं असतंस तर आज माझ्यावर एकटं पडण्याची वेळ आली नसती. आई म्हणून तुला काळजी होती पण त्यामुळे उठसुठ काही झालं की मला माहेरी यायला सांगायचीस. आई तू कधीच आमचं भांडण सोडवायचा प्रयत्न केला नाहीस. मी जेव्हा जेव्हा तुला फोनवर आमच्यातील वाद सांगायचे तेव्हा तू माझ्या नवऱ्याला फैलावर घेऊन पोरीला कायमची घरी घेऊन जाईन अशी धमकी द्यायचीस. शेवटी तू तेच केलंस. आज दहा वर्षांनी मला या गोष्टीची सल जाणवतेय. कारण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात सुखी आहे. तुम्ही दोघे सुना नातवंडांसोबत आनंदात आहात. दादा वाहिनीचा छान संसार सुरु आहे. मी मात्र तुमच्या घरात आश्रितासारखी राहत आहे, असं मला वाटतंय." हे सगळं बोलताना राजलच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.
"आमची पोरगी आम्हाला जड नाही." हे वाक्य लग्नानंतर अनेक पालकांच्या तोंडून ऐकायला मिळतं. मात्र सासरी मुलीचा छळ होतोय, सासरचे लोक किंवा नवरा तिला सतत त्रास देतोय असं मानून लगेच तडकीफड निर्णय घेणे चुकीचे आहे. टाळी जशी एका हाताने वाजत नाही तसेच तुमच्या मुलीचा देखील थोडा फार दोष असू शकतो हे समजून घ्या. सासरचे लोक विनाकारण त्रास देत असतील तर मुलीला घटस्फोट घे म्हणून सांगणे योग्य आहे. मात्र छोट्या कारणाने तिला संसार मोडायला लावणे अजिबात बरोबर नाही. तुम्ही सुद्धा नवरा बायको म्हणून संसार करताना चार गोष्टींवरून वाद तुमच्यातही झालेच असतील की. त्यामुळे लग्नानंतर नवरा बायकोत उडणारे खटके त्यांना सोडवू द्यात. लगेच मध्यस्थी करायला जाऊ नका.
लग्न ठरतानाच मुलीला सांगितले जाते, ‘सासरची माणसं खडूस असतात. सासू खाष्ट असते. नवऱ्याला मुठीत ठेवायचे.’ त्यामुळे मुलगी सासरी जातानाच डोक्यात पूर्वग्रह ठेवून जाते. सासू कितीही चांगली असली तरी तिच्याशी तुमची मुलगी फटकून वागू लागते. नवऱ्याला आपल्या तालावर नाचवायला पाहते. असे जर झाले नाही तर त्यांच्यात वाद होऊ लागतात. तेव्हा पालक म्हणून तुम्ही जळत्या निखाऱ्यावर पाणी घालायचे सोडून त्यावर आणखी फुंकर घालून आग अधिकच चेतावता हे तुमच्या लक्षात येत नाही. मुलीला कायमची माहेरी निघून ये असा सल्ला देता. यामध्ये तुमच्या मुलीचे आयुष्य पणाला लागलेले असते हे तेव्हा दिसत नाही. मुलीला सुद्धा त्या क्षणी आईवडिलांचा निर्णय योग्य वाटतो. कारण ती त्यावेळी मानसिक तणावातून जात असते.
काही वेळेस जावई माफी मागायला घरी आला तरी सुद्धा त्याला माफ केले जात नाही. ‘मी तिला घरी न्यायला आलोय, तिला माझ्यासोबत पाठवा,’ असे सांगितल्यावर त्याच्या समोर अटी ठेवल्या जातात. यामुळे जावयाचा अपमान होऊन या नात्यासाठी मी एकटाच पुढाकार का घेऊ असे त्याला वाटू लागते. प्रकरण चिघळले जाते आणि ते जावयाच्या अहंकारावर येते. मग तो सुद्धा नातं तोडण्याचाच विचार करू लागतो.
घटस्फोट झाल्यानंतर काही पुरुष दुसरा संसार थाटून आपले जीवन जगू लागतात. ज्या मुली आईकडे जाऊन राहतात त्यांना मात्र कालांतराने एकाकीपणा नकोसा होतो. ज्या आईने मुलीला साथ देऊन माहेरी आणले असते. त्याच आईसोबत जेव्हा मुलीचे सुद्धा वाद होऊ लागतात तेव्हा मुलीला आपली चूक उमगते.
पालकांनी मुलीचा संसार तोडायचा नाही तर जोडण्याचा प्रयत्न करायला हवा. एकदा का मुलगी सासरी गेली की तिचे उगाचच कान फुंकणे बंद करायला पाहिजे. उठ सुठ फोनवर बोलणे टाळावे. मुलगी नवऱ्याविषयी काही सांगू लागली तर छोटीशी गोष्ट आहे, तुम्ही दोघे मिटवून घ्या असा सल्ला तिला द्या. भांडण खूप विकोपाला गेले तरच तुम्ही मध्यस्थी करून त्यांच्यात समेट घडवा. तुमच्या अहंकारामुळे मुलीचे आयुष्य उध्वस्त होईल अशी कोणतीच भूमिका घेऊ नका. तिचे लाड करा चार दिवस माहेरपणाला आल्यावर हट्ट पुरवा. मात्र तिच्या संसारात नाक खुसण्याचा प्रयत्न करणे टाळा. पटतंय ना ?