⚜️फुलांची शिकवण⚜️
फुलांचे एक गाव होते. त्या गावाशेजारीच दगडांचे गाव होते. दगडांना फुलांचा खूप राग येई. कारण कोणीही फुलांनाच महत्त्व देत असे. प्रत्येक जण फुलांचीच स्तुती करत असे.
कोणीही दगडांना चांगले म्हणत नसत. दगडांना याचे खूप दु:ख होई. अनेक वर्षे त्यांच्या मनात हे दु:ख साठलेले होते.
एकदा काहीतरी कारण घडले. दोन्ही गावांत भांडण झाले. दगडांचा राग उसळून आला. त्यांनी फुलांवर जोरदार हल्ला चढवला. सर्व फुलांना नष्ट करायचे असे त्यांनी ठरवले. प्रत्येक दगड एकेका फुलाला ठेचू लागला. फुले मात्र अजिबात प्रतिकार करत नव्हती. जरासाही दु:खाचा उद्गार काढत नव्हती. उलट प्रसन्नपणे हसत होती.
दगडांना फुलांचे आश्चर्य वाटते. त्यांनी फुलांना विचारले," आम्ही तुम्हाला इतके ठेचतो तरी तुम्ही हसता कसे?" फुलांनी उत्तर दिले," तुम्ही आम्हाला जितके अधिक चिरडता, तितका अधिक सुगंध सर्वत्र पसरतो. त्याचा आम्हाला आनंद होतो."
तात्पर्य :- स्वत: दु: ख सोसून इतरांना आनंद देण्यातच सुख असते.