⚜️नागपंचमी⚜️
कलियुगाच्या आरंभापर्यंत विविध ठिकाणच्या देवतांना त्यांचे स्वतंत्र स्थान दिले जायचे, उदा. स्थानदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपालदेवता इत्यादी. त्याप्रमाणे भारतातील प्रत्येक गावात नागांना रहाण्यासाठी नागबन होते. या ठिकाणी मोठमोठे दाट वृक्ष जवळ-जवळ असायचे आणि त्यांच्या बुंध्याच्या मुळाशी वारुळ असायचे. प्रत्येक गावातील नाग तेथे रहायचे. अशी नागबने अजूनही कर्नाटक राज्यातील मुल्की, सुरतकल आदी ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात.
कोल्हापूरच्या जवळ असलेला सर्वपरिचित पन्हाळगड हा सुध्दा नागदेवतांचे आणि नंतर नागवंशियांचे निवासस्थान होते. याचे मूळ नांव पन्नागालय (झाडीत असलेले नागाचे घर )असे होते. पण नंतर नंतर अपभ्रंश होत होत पन्हाळा असे झाले. कोल्हापूरमध्येही नागाळा हा भाग नागवंशियांना युध्दाच्या वेळी अंबाबाई ने दिलेले निवासाची जागा पूर्वी ते नागालय असे होते. तेही अपभ्रंशाने नागाळा असे झाले.
श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते; म्हणून या तिथीला ‘नागपंचमी’ म्हणतात. खरतर आपला भारत देश कृषिप्रधान देश. शेतकऱ्यांचा मित्र हा नाग. उंदरांपासून शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण नाग करतो. तो कृतज्ञताभाव मनी ठेवून शेतकरी नागपूजन करतात.आपले सारे सण कृतज्ञताभाव आणि पर्यावरण यावरच आधारलेले आहेत.
श्रावण शुक्ल पक्ष पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात असतांना यमुनेच्या डोहात उडी घेऊन कालिया नागाचे मर्दन केले.
या दिवशी आस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून जनमेजय राजाने सर्पयज्ञ करणे थांबवले आणि आस्तिक ऋषींनी विश्वातील सर्व नागांना अभय दिले.
नागाच्या पूजनाचे महत्त्व : शिवाने जेव्हा हलाहल विषाचे प्राशन केले तेव्हा त्याला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले आणि त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी ‘मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल’, असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले. नऊ नाग हे नऊ प्रकारची पवित्रके (चैतन्यलहरी) ग्रहण करणारे घटक आहेत. त्यांच्या पूजनाने चैतन्यलहरींना धारण करणार्या समुहाचेच पूजन होते.
पूजनाचा विधी : या दिवशी गारुडी लोक नाग आणतात. त्याची पूजा करून त्याला दूध देतात. घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात. काही ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन करतात. नागाची पूजा करतांना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी पदार्थ वाहावेत.
पूजनाची फलप्राप्ती : नऊ नागांचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते.’
नागपंचमी आणि झोपाळा : नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी झोका खेळण्यामागील शास्त्र- नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे शास्त्रोक्त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोका खेळण्याची प्रथा परंपरांगत चालत आली आहे. झोका खेळण्यामागील इतिहास आणि झोका खेळतांना सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते,स्त्रिया झोका खेळतांना पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसर्या दिवशी सत्येश्वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत.वरील भाव ठेवून जेव्हा बहीण प्रत्येक विचार आणि कृती करते,तेव्हा भावाची ५ टक्के आध्यात्मिक आणि ३० टक्के व्यावहारिक उन्नती होते. म्हणून स्त्रिया श्रावणमासातील नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी झोका खेळतात असे म्हणतात.नात्यातील भावबंध जपण्याची ही अनोखी परंपरा भारतातच असावी.
प्राचीनकाळी सत्येश्वरी नावाच्या एका कनिष्ठ देवीला सत्येश्वर नावाचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून महिला नागपंचमी साजरी करतात.महाराष्ट्रातही नागपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होते. बत्तीस शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा होती. नागपंचमीच्या दिवशी स्वतः गोरक्षनाथ महाजनांच्या घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी ‘माई भिक्षा वाढ’ अशी हाक दिली. महाजनांच्या सुनेला बाहेर यायला थोडा वेळ झाला. गोरक्षनाथांनी विचारले, ‘एवढा वेळ का ?’ त्या महिलेने उत्तर दिले की, आज नागपंचमी आहे, म्हणून मी नाग प्रतिमेची पूजा करत होते. गोरक्षनाथ म्हणाले,‘‘आजपासून या गावामध्ये जिवंत नागाची पूजा होईल.’’ त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मंत्र सामर्थ्याने त्या ठिकाणी जिवंत नाग प्रकट केला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी बत्तीस शिराळा येथे जिवंत नागाची पूजा होऊ लागली. अशी एक आख्यायिका आहे.
कांहीही असो हे सण साजरे करताना नात्यांचे बंध जपण्यासाठी, निसर्ग आणि त्याच्यातील प्राणीमात्रांचे संरक्षण करणे हाच पूर्वजांचा हेतू आहे. हेच बंध पुढील पिढ्यांनी जपावं. पूजाअर्चा, कर्मकांड सोडलं तरी चालेल पण हा संस्कृतीतला भावनिक गाभा सांभाळणं, जतनं करणं फारच महत्त्वाचे ...!
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421