⚜️राजा आणि संत⚜️
एक दानशूर राजा होता. राजाची ख्याती ऐकून एक संत त्याच्या राज्यात आला. तो राजाला भेटायला राजमहालात गेला आणि दान घेणा-यांच्या रांगेत बसला. राजाने दान देण्यासाठी दोन कर्मचारी ठेवले होते. जेव्हा संताची वेळ आली तेव्हा तो कर्मचा-याला म्हणाला, भाऊ! मी आपल्या हाताने नाही तर राजाच्या हाताने दान घेईन. नाहीतर मी रिक्त हस्ते जाईन. राजाचा सक्त आदेश होता की कुणीही रिक्त हस्ते जायला नको. शेवटी संताची आणि राजाची भेट करून दिली. राजाने हात जोडून संताला त्याची इच्छा विचारली, तेव्हा संत म्हणाला, राजन! मला इतके धन पाहिजे की मी स्वर्गात जाऊ शकेन. राजाने हैराण होऊन विचारले, महात्मा! धनाने आपण स्वर्गात कसे जाऊ शकाल? कृपया स्पष्ट करा. तेव्हा संताने समजावले, राजन! मी आपल्याला हे सांगू इच्छितो की केवळ दान देण्याने आपण सुखी व्हाल नि भिक्षा मागणा-यांच्या जीवनात परिवर्तन होईल. आपण दान करीत राहाल तर एक दिवस राज्याची तिजोरी खाली होईल. परंतु भिक्षा मागणारांची रांग कमी होणार नाही. राजाने उपाय विचारला, तेव्हा संत म्हणाला, आपण जे धन दान म्हणून देत आहात, तेच रोजगाराच्या स्वरूपात द्या. त्यातून या लोकांना काम मिळेल, जे आज भिक्षा वृत्तीने ग्रासले आहेत. आपण त्यांना जी सुविधा दिली आहे, त्यामुळे ते कमजोर झाले आहेत. आपण त्यांना परिश्रम करायला शिकवा. हेच खरे दान ठरेल.
तात्पर्य:- स्वावलंबन आत्मविश्वासाची अनिवार्य अट आहे आणि त्यावरच सामाजिक व राष्ट्रीय विकास आधारित आहे.