⚜️चमचे चोर !⚜️
एका श्रीमंत गृहस्थाकडे मेजवानीसाठी चाळीस जणांना बोलावले होते, त्यापैकी वीसजणांनी श्रीखंडाच्या वाटीत दिलेला एकेक चांदीचा चमचा जेवण संपता संपता चाटून व स्वच्छ करुन, आपापल्या खिशात घुसडला.
नोकराने ही गोष्ट यजमानाच्या दृष्टीस आणताच यजमान हाती लागलेले २० चमचे घेऊन निमंत्रित पाहुण्यांसमोर आले आणि त्यांना उद्देशून म्हणाले, 'आपण सर्व माझ्या निमंत्रणाला मान देऊन जेवयला आलात, म्हणून मला अतिशय आनंद झाला. तुम्हीही आता घरी जायला निघाला आहात. माझ्याकडे येऊन मला जसे तुम्ही आनंदित केलेत, तसेच तुम्हाला आनंदित करुन सोडावे म्हणून मी माझ्या अंगात असलेल्या जादूच्या कलेची थोडीशी चुणुक तुम्हाला दाखवितो.
याप्रमाणे बोलून त्याने आपल्या हातात असलेले वीस चमचे मोजून दाखवले. चतुर यजमान पुढं म्हणाला, 'आता माझ्या हातात असलेले चमचे बरोबर वीस आहेत, हे मी तुम्हाला मोजूनच दाखविले. तेव्हा हे वीस चमचे मी माझ्या खिशात घालतो, आणि ते सर्व चमचे मी तुमच्यापैकी वीस जणांच्या खिशातून काढून दाखवितो.' असे म्हणून यजमानाने हातातील वीस चमचे आपल्या खिशात घातले. नंतर त्याने प्रत्येक पाहुण्याचा खिसा चाचपला आणि चोरांच्या खिशातून एकूण वीस चमचे बाहेर काढले व ते आपल्या गड्याच्या स्वाधीन केले.
तात्पर्य:- आलेल्या पाहुण्यांचा अपमान होऊ न देता, चोरीस गेलेले सर्व चमचे मिळविण्याची त्या यजमानांची युक्ती खरोखरच किती अपूर्व होती.