⚜️विद्याधन भाषिक उपक्रम - शब्दांच्या जोड्यातील फरक⚜️
विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो,
काय गंमत आहे पाहा, एका काना-मात्रेच्या, एखाद्या अनुस्वाराच्या किंवा न्हस्व- दीर्घाच्या फरकाने भाषेतील शब्द अगदी वेगळाच अर्थ सांगतात. निराळ्याच गोष्टीचा निर्देश करतात.
उदा.
- शव - प्रेत
- शेव - खाण्याचा पदार्थ आणि साडीचा पदर.
एका मात्रेच्या चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो ना? किंवा 'शेव' शब्दाचा दोनपैकी नेमका कोणता अर्थ घ्यायचा, हे संदर्भावरून ठरते.
अशा काही शब्दांच्या जोड्या पुढे अर्थासह दिल्या आहेत.
१. अभिनव - नावीन्यपूर्ण
अभिनय - हावभाव
२. आचार - वागणूक
आचार्य - पुरोहित, पंडित
३. आबा - एक नाव, आजोबांचे संबोधन
आंबा - एक फळ
४. आव्हान - लढाईस बोलावणे, हटकणे
आवाहन - हाक मारणे, बोलाविणे
५. आस - आशा
आस - गाडीचा
६. आते - आत्या
आत - मध्ये
७. कद - रेशमी वस्त्र
कंद - मूळ
८. कडी - दाराची
कंडी - अफवा, वदंता
९. कबर - थडगे
कंबर - शरीराचा भाग
१०. काजी - मुसलमान न्यायाधीश
कांजी - पेज, कण्हेरी
११. काकू - चुलती
कांकू - धरसोड
१२. काच - एक पारदर्शक पदार्थ
काच - जाच, छळ
१३. कात - विड्यातील एक पदार्थ, सापाची त्वचा
कांत - नवरा, पती
१४. का - काय
का - कारण
१५. काप - तुकडा, कुडी (कानातला दागिना)
काप - कंप
१६. क्रांती - एकदम होणारा बदल
उत्क्रांती - हळूहळू होणारा बदल
१७. कुडी - देह, शरीर
कुंडी - मातीचे पात्र
१८. खोड - सवय
खोंड - वासरू (नर)
१९. गृह - घर
ग्रह - आकाशातील तेजोगोल
२०. ग्राम - गाव
ग्राम्य - खेडवळ
२१. घात - नाश
प्रघात - रूढी
२२. घाट - नदीवर बांधलेला धक्का
घांट - घंटा
२३. चक्र - चाक
परचक्र - शत्रूचा हल्ला
२४.चिता - सरण
चिंता - काळजी
२५. जव- धान्य
जव- जोपर्यंत
२६. ढग - मेघ
ढंग - चाळे
२७. तगडी- सशक्त
तागडी - तराजू
तंगडी - पाय
२८. तग - टिकाव
तंग - गंभीर वातावरण, घट्ट (कपडे)
२९. तात - वडील
तात - तंतू
३०. दार - दरवाजा
दारा - बायको
३१. दिन - दिवस
दीन - गरीब
३२. दुर्ग - किल्ला
दुर्गा - देवी
३३. देहात - देहामध्ये
देहान्त - मृत्यू
३४. द्विप - हत्ती
द्वीप- बेट
३५. नदी - सरिता
नंदी - शंकराचे वाहन
३६. नाव - होडी
नाव - संज्ञा, नाम
३७. निज - आपले, जवळचे
नीज - झोप
३८. निश्चित - खचित
निश्चिंत - चिंतारहित
३९. पत्र - लिहावयाचे पत्र
पात्र - योग्य भांडे, नाटकातील पात्र
४०. पत - लायकी, अब्रू
पंत - बहुमानदर्शक शब्द
४१. परिमाण - मापदंड, निकष
परिणाम - शेवट
४२. पाचू - रत्न
पाच - संख्या
४३. पाणि - हात
पाणी - जल
४४. पिक - कोकीळ
पीक - शेतातील पीक
४५. फंड - वर्गणी
फड - जमाव
४६. बाक - बसावयाचा बाक
बांक - वाकडेपणा
४७. बेगडी - बगड लावलेले
बेगडी - नकली
४८. भराभर - लवकर
भाराभर - पुष्कळ
४९. भाग - हिस्सा
भांग - गांज्याची हिरवी पाने
५०. भाडे - कर
भांडे - पात्र
५१. भोग - सुखभोग
भोग - दुःख, वेदना
५२. मद - गर्व
मंद - सावकाश
५३. मत्सर - द्वेष
मच्छर - डास
५४. मास - महिना
मांस - शरीराचे मांस
५५. माडी - मजला
मांडी- शरीराचा पायावरचा भाग
५६. रग - जोर, सामर्थ्य, उबदार पांघरूण
रंग - वर्ण
५७. राग - संताप
रांग - ओळ, पंक्ती
५८. लक्ष - नजर, लाख
लक्ष्य - ध्येय
५९. वदन - तोंड
वंदन - नमस्कार
६०. वाचणे - पुस्तक वाचणे
वाचणे - जगणे, बचावणे
६१. वाटणे - मनात येणे
वाटणे - देणे (वाटून टाकणे)
वाटणे - पाटा वरवंट्यावर वाटण्याची क्रिया
६२. वेदांत - वेदांमध्ये
वेदान्त - तत्त्वज्ञान
६३. वर्ग - समूह
वर्ग - अंकगणितातली संकल्पना,
वर्ग - बदली
६४. वज्र - आयुध
वज्र - हिरा
६५. व्याप - पसारा
उपद्व्याप - भानगडी, त्रास
६६. उगा - उगाच
उगी - गप्प
६७. शव - प्रेत
शेव - खाण्याचा पदार्थ, साडीचा पदर.
६८. शिला -खडक
शीला- एक नाव
६९. शित - भाताचे शित
शीत - थंड
७०. शिर - डोके
शीर - रक्तवाहिनी
७१. सरण -चिता
सारण - पुरण
७२. सचिंत - चिंतातुर
संचित साचविलेले
७३. सून - स्नुषा
सुनं - रिकामा, शून्य
७४. सुत - मुलगा,
सूत - दोरा
७५. सुर - देव
सूर - स्वर, आवाज
७६. सुद्धा - देखील
सुधा - अमृत
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421