⚜️अस्वलाची शेपटी⚜️
ही गोष्ट आहे अगदी सुरुवातीच्या काळातली. ब्रह्मदेवाने नुकतेच सृष्टीला बनवले होते. हळू हळू पुथ्वीवर त्याने एक एक सजीवाची निर्मिती केली. वाघ, ससा, कासव, हरीण, बकरी, घोडा, गाढव, असे सगळेच प्राणी ब्रह्मदेवाने तयार केले. त्यांच्यासाठी अण्णा आणि पाण्याची व्यवस्था केली. मात्र आज जसे आपल्याला हे प्राणी पाहायला मिळतात तसे ते तेव्हा नव्हतेच. ब्रह्मदेवाने कोणत्याच प्राण्याला शेपटी दिली नव्हती. सुरुवातीला तर कोणत्याच प्राण्याला काही त्रास झाला नाही. पण मग हळू हळू सर्वांना शेपटीसारखा अवयव नसण्याचे तोटे जाणवू लागले.
सगळ्यांना काहींना काही कारणासाठी शेपटी आवश्यक वाटायला लागली. काही प्राण्यांना माश्यांपासून संरक्षण म्हणून शेपटी हवी होत. तर खारू सारख्या प्राण्यांना आपण अधिक सुंदर दिसावे म्हणून शेपटी हवी होती. आपले झाडावरचे जीवन अधिक सुरक्षित होण्यासाठी माकडांना शेपटी हवी होती.
शेपटीची गरज तर सर्वांनाच होती म्हणून मग सर्वांनी एक दिवस मिळून ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. ब्रह्मदेव प्रकट झाले तेव्हा साऱ्यांनी आपापले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. ब्रह्मदेवाने सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि एक दिवस ठरवून सर्वाना शेपट्या देण्याचा कार्यक्रम घेण्याचे ठरवले.
ब्रह्मदेवाचा निर्णय ऐकून सगळे अतिशय खुश झाले. आपले सगळे कष्ट संपतील, या घोंघावणाऱ्या माश्यांपासून सुटका मिळेल या भावनेने सगळ्यांची मने उल्हसित झाली. तो दिवस त्यांनी एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला. आता त्यांना प्रतीक्षा होती ती ब्रह्मदेवाने ठरवून दिलेल्या दिवसाची.
शेवटी तो दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळीच सर्वांनी छान तयारी केली आणि ब्रह्मदेवाने ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहचले. ब्रह्मदेवाने आधीच एक मोठा वाडा सर्वांसाठी तयार करून ठेवला होता. त्या वाड्याला चारही बाजूंनी आरसे होते. आणि मधोमध वेगवेगळ्या शेपट्या ठेवल्या होत्या.
त्यादिवशी एकीकडे सगळे त्या महालात जाऊन आपल्याला शोभेल ती शेपटी घेऊन येत होते. तर दुसरीकडे अस्वल मात्र चांगलेच घोरत पडले होते. त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण अस्वल काही उठत नव्हते. पाच मिनिट थांब, दहा मिनिट थांब असे करत अस्वल पुन्हा लोळण घेत होते.
असे करता करता दुपार झाली. दुपारी नव्याने भेटलेली झुबकेदार शेपटी मिरवत जेव्हा घोडा अस्वलापाशी आला तेव्हा त्याच्या शेपटीला पाहून अस्वलाची झोपच उडाली. त्याने लगेच तयारी केली. मोठ्या उत्साहाने तो महालात पोहचला. पण तेथे त्याचा पूर्ण हिरमोद्ध झाला.
आत गेला तर तेथे एकही शेपटी नव्हती. तो लगेच ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने त्याला एवढा उशीर का झाला त्याबद्दल विचारले. त्याच्याकडून पूर्ण सत्य जाणून घेऊन ब्रह्मदेवाने त्याला बिना शेपटीने राहणे हेच त्याचे भाग्य असल्याचे सांगितले.आणि ब्रह्मदेव अदृश्य झाले. तेव्हापासून अस्वल बिना शेपटीने जगत आहे.
तात्पर्य :- आळस हा माणसाचा शत्रू आहे. कधीही आळस करू नये.