⚜️भक्तीचे महात्म्य⚜️

⚜️भक्तीचे महात्म्य⚜️ 

   चोखामेळा नावाचा वैष्णव भक्त पंढरपूरात रहात असे. अंतःकरणात शुध्द भक्ती पाहून भगवंत त्याला प्रसन्न होते. ते रोज चंद्रभागेचे स्नान करुन, नगर प्रदक्षिणा घाली आणि महाद्वारात येऊन लोटांगण घालण्याचा त्यांचा नित्यनियम होता. परंतू सामाजिक बंधनामुळे त्यांना आत जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नव्हता म्हणून  देवाचे रुप ध्यानात आणून ते दुरुनच नमस्कार व भजन करीत असे.
     एकदा ते आपला नित्यनियम आटोपून भजन करीत बसले असता. काही निंदक म्हणाले, "अरे चोख्या ! देवाला तूं कधी पाहिले नाहीस आणि देवाचे भजन कशाला करतोस. तुझ्यावर पांडुरंगाचे प्रेम असते तर त्याने तुला मंदिरात प्रवेश करु दिला असता." त्यांचे कटू बोलणे ऐकून चोखामेळाने त्यांना नमस्कार केला व म्हणाले, "पांडुरंगाच्या पायावर डोके टेकवून त्याचे दर्शन घ्यावे एवढी माझी योग्यता नाही. तो माझे रक्षण करतो दर्शन नसले तरी मी त्याच्या सान्निध्यात आहे. हे समाधान कमी नाही." निंदकाच्या बोलण्याने उदास होऊन रात्री तसेच घरी गेले.
     भजन, जेवण झाल्यानंतर रात्री झोपले असता गाढ झोपेत असताना त्यांना पांडुरंग आले. त्यांनी चोखोबांना जागे केले आणि त्यांच्या हाताला धरुन मंदिराच्या गाभाऱ्यात नेले. तेथे देव त्यांच्याशी गुजगोष्टी करीत बसले. त्यांच्या चाललेल्या गुजगोष्टी पुजाऱ्याने ऐकल्या व इतर भक्तांनीही ते पाहिले. लोक म्हणू लागले, "सर्व दारांना कुलूपे असताना तूं आत कसा आलास ? चोखोबा म्हणाले, माझ्या घरी येऊन माझ्या हाताला धरुन राऊळात आणले. मी तुमचे लेकरु आहे. माझ्याकडून काही आगळीक घडले असेल तर मला क्षमा करा.
     पुजारी म्हणाले, देवाला तूं बाटवले याची शिक्षा म्हणून तुला गावाबाहेर न राहता चंद्रभागेच्या पैलतीरावर जाऊन रहावे लागेल. तूं इथे राहिलास तर देव पुन्हा देवळात घेऊन येतील.
     चोखामेळा म्हणाला, मायबाप ! मी तुमचा सेवक, साफसफाई करणारा, इतके दिवस मरा सांभाळून घेतले. आता मला दूर कां लोटता ? असे म्हणून दुःख करुन आसवे ढाळू लागला.
     मनांत म्हणाला, हे कृपावंत विठ्ठला ! आजपासून तुझे चरण दुरावले. माझे दैव निष्ठुर आहे. चोखोबा घरी आले आणि पत्नीसह चंथद्रभागेच्या पैलतीरी रहायला गेले. त्यांने मंदिराच्या सन्मुख अशी पैलतीरावर दीपमाळ बांधली आणि तेथे बसून विठ्ठल चिंतन आणि भजन करु लागले. अद्याप चंद्रभागेच्या तीरावर ती दीपमाळ आहे.
     एके दिवशी चोखामेळा भजन संपल्यावर भोजनाला बसले. तेव्हा अकस्मात साक्षात पांडुरंग त्यांच्या पानात भोजनाला बसले. लिंबाच्या वृक्षाखाली सावलीत देव चोखोबा बरोबर जेवत बसले आसताना तेथे काही कारणानिमित्त मंदिरातील पुजारी आला होता. तो दुरुन त्यांच्या जेवणाची गंमत पहात उभा राहिला. विठोबाला दही वाढायला आलेल्या चोखोबाच्या पत्नीच्या हातून दही वर उसळले व थोडे थेंब देवाच्या पितांबरावर उडाले. तेवढ्यात एक कावळा निंबोळ्या खाऊन खाली टाकू लागला.
     चोखोबा त्या कावळ्याला म्हणाले, "अरे कावळ्या रमाकांत इथे जेवायला बसला आहे. कडू लिंबोळ्या खाऊन खाली टाकू नकोस. आन्नात पडतील. तूं दुसऱ्या फांदीवर बस.". हे चोखोबाचे वचन पुजाऱ्याने ऐकले. त्याला वाटले आपल्यालाच तो कावळा म्हणाला. 
     हा असंभवित असताना देव त्यांच्या बरोबर कसे जेवण करतो ? असे म्हणून तो रागाने चोखोबा जवळ गेला आणि रागाने त्याच्या गालावर जोरात थप्पड मारली. पुन्हा संतापून चोखोबाला अद्वातद्वा बोलला आणि पुन्हा विटाळ झाला म्हणून नदीमध्ये स्नान करुन मंदिरात गेला.
     विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जवळ गेला. पहातो तर काय. देवाचा पाषाणाचा गाल सुजून वर आला होता. तसेच डोळेही सुजलेले व पाण्याने भरलेले दिसले.
     पितांबरावर दह्याचे शिंतोडे पहाताच पुजारी भयभीत होऊन धावतच चोखोबाच्या घरी गेला. त्यांना शरण जाऊन म्हणाला, "भक्तीचे महात्म्य" मला ओळखता आले नाही. मी व्यर्थ तुझा छळ केला परंतू त्याचा त्रास देवाला झाला.
     पुजाऱ्याने झालेली सर्व हकिकत चोखोबांना सांगून त्यांना घेऊन पुजारी मंदिरात आला. चोखोबांनी देवाच्या मूर्तीला आलिंगन दिले. प्रेमभराने देवाच्या मुखावरुन हात फिरवला तत्क्षणी देवाच्या गालावरील सूज नाहीसी होऊन गाल पूर्ववत झाला. तेव्हापासून चोखाबाला मंदिरात येण्याचा कोणीही प्रतिबंध केला नाही.