⚜️इमानदारी⚜️
एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो, त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो. राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते. गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात. त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते. मनातून ती त्याला पूजत असते. स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते, "मी पण जाणार त्यादिवशी दरबारात"
आई समजावते कि, "तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार, तुझी निवड कशी होईल ? तू दिसायलाही फार सुंदर नाहीस..!! मुलगी म्हणते, "ते मलाही माहित आहे, पण या निमित्ताने मला राजकुमार जवळ थोडा वेळ तरी जाता येईल. जवळून पाहता येईल. इतकेही मला पुरेसे आहे"
ठरलेल्या दिवशी शंभरेक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात. त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते. दरबार भरतो. राजकुमार येतो. राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक "बी" काढून देतो. सर्वाना बिया देऊन झाल्यावर, राजकुमार सांगतो, "हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा. त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या. जिच्या कुंडीतल्या झाडाचे फुल सर्वात जास्त सुंदर असेल, तिच्याशी मी लग्न करेन "
सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात. नोकराची मुलगीही घरी येते. एका कुंडीत ते बी पेरते. रोज काळजीने त्याला खत, पाणी वगैरे देते. पण दोन महिने झाले तरी त्यातून काहीच उगवत नाही. मुलगी हार मानत नाही. एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते. त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते. पण कुंडीतून काहीच उगवत नाही. यातच तीन महिन्याची मुदत संपत येते. शेवटी ती निराश होते.
तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात. प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल असते. ती नोकरांची मुलगीही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते, ज्यात काहीच उगवलेले नसते. सगळ्याजणी तिला हसतात. इतक्यात राजकुमार हजर होतो. तो सर्व कुंड्याचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो कि, "ती मुलगी मी निवडली आहे, "
सगळा दरबार चकित होतो. काही सुंदर मुली चिडतात. त्यातली एक धिटाईने पुढे येऊन विचारते, "जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही, तिची निवड का ? उलट माझ्या कुंडीत पहा, किती सुंदर गुलाब फुलला आहे. मग माझी निवड का नाही ?"
राजकुमार हसून उत्तर देतो, "फक्त ती (नोकराची मुलगी) या पदासाठी योग्य आहे. कारण तिनेच एकटीने "इमानदारीचे" फुल फुलवले आहे. मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या. त्यातून फुल तर सोडाच पण काहीही उगवणार नव्हतेच."
सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो ! आणि त्या नोकराच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाझरू लागतात.
तात्पर्य :- इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे, तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो. म्हणून महत्वाची इमानदारी, सलाम करेल दुनियादारी.