⚜️सुख हरवू देऊ नका⚜️


⚜️सुख हरवू देऊ नका⚜️

     एका धनिकाला एका ज्योतिष्याने सांगितलं की तुमचे आता आठच दिवस राहिले आहेत. काय ती निरवानिरव करून टाका. अपुऱ्या इच्छा काही असतील, त्या पूर्ण करून घ्या.
    धनिकाने वेगवेगळ्या ज्योतिष्यांकडून खात्री करून घेतली, सगळ्यांनी हेच भविष्य वर्तवलं. धनिक म्हणाला, पृथ्वीवर कमावण्यासारखं जे आहे ते मी मिळवलं, पैसाअडका खूप आहे माझ्याकडे. पण, सुख कशाला म्हणतात ते काही मला कळलं नाही. आजवर ते मिळालं नाही. मला कुणीतरी सुखाची एक छोटीशी झलक तरी दाखवली, तर त्या माणसाला मी हवी तेवढी संपत्ती द्यायला तयार आहे. ज्योतिषी म्हणाले, तो आमचा विषय नाही. सुख ज्याचं त्याने शोधायचं.
    बऱ्याच ठिकाणी विचारणा केल्यानंतर तो धनिक निराश झाला. शेवटी खजिन्यातल्या मौल्यवान हिरेमाणकांची एक थैली घेऊन, एका घोड्यावर स्वार होऊन तो गावोगाव फिरू लागला, सुखाची झलक दाखवा, असं आवाहन करू लागला.
एका गावातले लोक त्याला म्हणाले, तुम्ही योग्य ठिकाणी आलात. असल्या उटपटांग माणसांना सरळ करणारा एक माणूस आहे आमच्या गावात. एक फकीर आहे, त्याला भेटा.
धनिक म्हणाला, पण, मी उटपटांग काय केलं?
गावकरी म्हणाले, पैसे देऊन सुख खरेदी करायला निघालायत आणि वर विचारताय?
भेटा फकिराला. तोच ठीक करेल तुम्हाला.
फकीर एका झाडाखाली बसला होता. धनिकाने त्याच्यासमोर थैली टाकली आणि म्हणाला, यात कोट्यवधींची संपत्ती आहे. ती घे आणि मला सुख मिळवून दे. सुखाची किमान झलक तरी दाखव.
   फकीर म्हणाला, एका मिनटात दाखवतो. त्याने थैली उचलली आणि धूम ठोकली.आधी या धनिकाला कळेचना काय झालं. जेव्हा कळलं तेव्हा तो ओरडू लागला. ‘पळाला, पळाला, माझी हिरेमाणकं घेऊन पळाला, चोर चोर’ हा त्याचा पुकारा ऐकल्यावर गावकरी गोळा झाले. त्यांना त्याने काय झालं ते सांगितलं. सगळे फकिराच्या मागे धावू लागले. फकिराने सगळ्या गावाला सगळा गाव फिरवला आणि पुन्हा त्याच झाडापाशी आला. ती थैली त्याने होती तिथेच ठेवली आणि झाडामागे पळाला.
     धनिक धापा टाकत झाडापाशी पोहोचला. त्याने थैली उचलून हृदयाशी कवटाळली. त्याचं मन आनंदाने भरून आलं. 
झाडामागून फकिराचा आवाज आला, झलक मिळाली?
धनिकाने विचार केला, हो, खरंच किती सुख मिळालं ही थैली मिळाल्यावर. फकीर म्हणाला, ती थैली तुझ्यापाशी आधीही होती. पण, तू सुखी नव्हतास. ती हरवली, तेव्हा तुला तिची किंमत समजली, ती असण्यातलं सुख समजलं. आपण सुखातच जन्माला आलो आहोत.
तात्पर्य:- ते आपल्यापाशी आहेच. ते हरवू दिलं नाही, तर शोधायची वेळच येत नाही.