⚜️खरा मित्र⚜️
श्याम आणि राम हे दोघे जिवलग मित्र होते. एके दिवशी ते जंगलातून चालले होते. अचानक त्यांना एक अस्वल त्यांच्याकडे येताना दिसले. श्याम पटकन धावला आणि जवळच्याच एका झाडावर चढला. रामला झाडावर चढता येत नव्हते. पण त्याने प्रसंगावधान राखले. रानटी प्राणी मेलेल्या माणसाला इजा करत नाहीत, असे त्याने ऐकले होते. म्हणून तो हालचाल न करता जमिनीवर पडून राहिला. त्याने आपले डोळे बंद केले आणि श्वास रोखून धरला. अस्वल रामजवळ आले. त्याने रामचा चेहरा हुंगला. हा माणूस मेलेला आहे, असे वाटून अस्वल तसेच पुढे निघून गेले.
अस्वल दिसेनासे होताच श्याम झाडावरून खाली उतरला. तो रामजवळ गेला. त्याने रामला विचारले, “त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले ?” राम श्यामला म्हणाला, “ते अस्वल म्हणाले की, स्वार्थी मित्रांपासून नेहमी दूर राहा.
तात्पर्य : जो संकटात मदत करतो, तोच खरा मित्र होय.