⚜️कासव आणि हंस⚜️
एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे.
खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते.
एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे.‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला.
‘हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलले.
कासवाच्या मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते.
‘आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले.
कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे.’ ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे. शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल.’
हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, ‘आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो.’
‘मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो.
हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे.’ कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता.
शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले.
ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला.’ हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते.’ आणि नंतर ते उडून जातात.
तात्पर्य:- मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.