⚜️भगवान परशुराम - भाग -४⚜️

⚜️भगवान परशुराम - भाग -४⚜️ 

     सत्यवती सर्व उत्सुकतेने न्याहळतांना बघत असलेली बघून, ऋचिकांनी विचारले, आर्येऽ! आवडले ना? सत्यवती म्हणाली, कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. बाळ इथे छान रमेल. नंतर मुनी, गाधीराजाकडे वळून म्हणाले, आपण सत्यवतीची काळजी बिलकुल करु नका. मुनीवर्य, ज्या दिवशी कन्या आपल्या हाती सोपवली, तेव्हाच निर्धास्त झालो. आपली ठेव आपल्याकडे आणून सोपवली. उदईक आम्ही प्रस्थान करु. राजा बाळाकडे अनिमिष नेत्रांनी बाळाकडे बघत होते. त्याचे मुख जणू प्रदिप्त अग्निच! महामुनींच्या मुखातून शब्द निघाले... जमत् अग्नी! ठरले. सत्यवती कडे बघत मुनी म्हणाले बाळाचे नांव निश्चित झाले... "जमदग्नी"! छान नाव आहे जगत् अग्नी...प्रदिप्त तेजस्वी अग्नीसारखा आपल्या ज्ञानाने संपूर्ण जग उजळून टाकेल.
         दुसर्‍या दिवशी पहाटेच लाडकी कन्या सत्यवतीचा निरोप घेऊन गाधीराजा सेवकासह उत्तरे कडे परत निघाले. कलाकलाने जमदग्नी वाढत होते. आता ते पिताश्री ऋचिकांंबरोबर शास्रार्थ, वेद व इतर विद्या आपल्या तल्लख बुध्दीने ग्रहण करीत होते. पिताश्री बरोबर गंगेकाठी तासन् तास ध्यान धारणा करुं लागले. त्यादिवशी त्यांना गंगेवरुन यायला बराच वेळ लागल्यामुळे, एकटेच आलेल्या पतीला सत्यवती ने विचारले, आपण एकटेच? लेकरु अजून आलं नाही आज तो फक्त दुध घेऊनच गेला. अग! तो ध्यानाला बसला. त्याला जागे करणे सोपे नाही. हा मार्ग मोठा खडतर आणि एकाकी. ध्यान लागणे फार कठीण असते. त्याला खरी लय सांपडली असतां, कसे जागे करायचे? अगऽ, आता तो लहान नाही. माझेशी शास्रार्थ करतांना ऐकलेस ना? त्यांचा अलिप्तपणा बघून ती म्हणाली, मीच जाऊन बघते, बाळाला ध्यानास्थावस्थेत कसा दिसतो. आणि ती अनवाणी पायाने गंगेकडे निघाली. गंगेकाठी पोहचल्यावर तिला दिसले, गंगेच्या मधे असलेल्या एका महाकाळ शिळेवर, तिचा बाळ जमदाग्नि पद्मासनात ध्यानस्थ बसले होते. आपल्या पुत्राची ध्यानस्थ मूर्ती बघून, सत्यवतीचे मन भरुन आले. त्यांच्या मुखातील काव्य ऐकून, साक्षात सरस्वतीचा वरदहस्त असल्याशिवाय इतके सुंदर, अर्थमधूर काव्य बहरणे शक्य नाही याची तिला जाणीव झाली.
        भार्गवकुलातील वरुणोपसेने बरोबरच, इंद्राचीही उपासना जमदाग्नी करीत होते. इंद्रदेव प्रसन्न व्हावे म्हणून ते माता गंगेला शरण गेले. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. उडालेल्या धुळीमुळे सत्यवतीला समोरचे कांहीही दिसेनासे झाले. कांही क्षण तिचे डोळे मिटल्या गेले. उघडले तेव्हा तिला दिसले, गंगेचे पाणी वाढत आहे. बाळाला जागे करण्याच्या उद्देशाने त्याचेकडे जायला निघाली तर, पाय जागचे हलेना. अचानक एक प्रचंड तेजोवलय आपल्या पुत्राकडे जातांना बघून कांहिशा आश्चर्याने व भीतीने डोळे गच्च मिटले. कांही क्षणात वातावरण निवळले. गंगेचा प्रवाह पूर्ववत झाला. समोर बघितले तर, पुत्राशेजारी काळ्या रंगाची एक सवत्स धेनू आपल्या पाडसासह उभी दिसली.
        जमदाग्नींचे ध्यान संपले. त्यांनी शेजारी उभी असलेल्या गाईच्या व पाडसाच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला व गाय, पाडस घेऊन घराकडे निघाले तोच माता समोर दिसली. बाळा सारं अद्भूत या डोळ्यांनी बघितले. बाळा अचानक ही धेनु कुठून आली? अचानक नाही माते, भगवान इंद्रांनी प्रसन्न होऊन साक्षात इथे येउन दिली.पण मला कसे नाही दिसले? जमदाग्नी नुसते हसले. म्हणाले, अम्ब! ही कामधेनू आहे. मनी जी इच्छा धरु ती पूर्ण होते. तुला काय हव ते माग! मला कांहीही नको. तुझ्यासारखा पुत्र मिळाला, या परते दुसरं भाग्य कोणते? दोघेही आश्रमाकडे निघाले. आश्रमाच्या अंगणात उभे असलेले ऋचिक यांना बघून म्हणाले, मी कधीची तुमची व कामधेनूची वाट बघत आहे. म्हणजे? मला सारं आधीच माहित होतं, म्हटल्यावर, सत्यवती नुसती त्यांचेकडे पाहत राहिली.
     इकडे रेणुराजाच्या पोटी रेणूका नावाने जगदंबेने जन्म घेतला. ती महान कन्या बालपणा पासून भगवान शंकराच्या ध्यानात मग्न असे. जमदाग्नीची किर्ती सर्व दूरवर पसरली होती. रेणूकाने त्यांनाच शंकराच्या जागी माणून त्यांचेशीच विवाह करण्याचा आपला निश्चय पित्याच्या कानी घातला होता. त्यांनीही जमदाग्नीची किर्ती ऐकली होतीच. त्यांनी कन्येचा विधीपूर्वक विवाह करुन दिला.साक्षात पार्वती असलेली रेणूका पतीसह आश्रमात राहून मनोभावे पतीसेवा करुं लागली. यथावकाश त्यांना तेजस्वी चार पुत्र झाले. वसु,वसुमती,सुषेन,विश्ववसु. 
    आणि देवांनी दिलेल्या वरानुसार, वैशाख शुध्द तृतीया मध्यानकाळी, रेणुकामातेच्या उदरी जन्मले, आजन्मा परमात्मा! श्रीविष्णूंनी भार्गवराम नावाचा धारण केलेला हा सहावा अवतार! भृगु वंशातील या भार्गवरामाने परशु धारण केला म्हणून ते परशुराम म्हणून ओळखल्या जाऊ लागले. भृगुमुनींनी सत्यवतीला दिलेल्या वचनानुसार हा क्षत्रिय स्वभावाचा नातू झाला होता.
    परशुराम मोठे झाल्यावर, वेदशास्राचा अभ्यास करुन, शंकराला प्रसन्न केले. त्यांचेकडून गदा परशु व तलवारीचे शिक्षण घेऊन प्राविण्य प्राप्त केले.