⚜️कोरड्यास आणि कालवण⚜️
ग्रामीण भागात आजही वापरले जाणारे शब्द म्हणजे 'कोरड्यास' आणि 'कालवण'. पातळ भाजीला 'कोरड्यास' म्हणतात. काही ठिकाणी त्यालाच 'कालवण' म्हणतात. कोरडे म्हणजे शुष्क असे कोरडे पदार्थ खाताना गिळताना त्रास होतो. म्हणून मग पातळ भाजी करणं सुरू झालं. ती पातळ भाजी मग 'कोरड्या'सह खाऊ लागले. या 'कोरड्यासह' खाण्याचंच झालं 'कोरड्यास'. भाकरी किंवा चपाती खाताना ती या 'कोरड्यास'मध्ये कालवून खाणं लोकांना आवडू लागलं. असं कालवून खाणं ज्यामुळं शक्य झालं ते झालं 'कालवण'. हे दोन्ही शब्द आजही मराठीत वापरले जातात. खास मराठी असणारे हे शब्द आपल्या रोजच्या अनुभवातून तयार झालेले आहेत.