⚜️भगवान परशुराम - भाग - ९⚜️
रामाची विनित वत्ती, ज्ञानलालसा आणि तपस्या बघून प्रसन्न झालेल्या श्रीगणेशांनी रामाला परशु विद्येचे रहस्य देत म्हणाले, सर्व प्राणीमात्रच काय पण देवदुर्लभ असलेले हे परशु अस्र हस्तमुक्त शस्र आहे. त्यामुळेच याचे सामर्थ्य अनन्यसाधाराण महत्व आहे. क्षेपणी, पाश, चक्र, शक्ती ही इतर चार हस्तमुक्त शस्रे आहे. प्रत्येकाचे सामर्थ्य वेगळे आहे. परशु धारण करणारा सशक्त, बलदंड असायला हवा. ते शस्र वजन दार असल्यामुळे, सहज पेलून शत्रूचा लक्षवेध घेता यायला हवा. परशुच्या रचनेचे वर्णन करुन श्रीगणेश म्हणाले, परशु फेकण्याच्या पध्दतीला हात म्हणतात. हे शस्र तुला अस्र म्हणून प्रदान करीत आहे. राम, हा चिन्मय परशु लोककल्याणार्थ अस्ररुपाने देत आहे. या परशुरुपाने मी तुला माझे आत्मीयरुपच देत आहे,असे म्हणून गणेशांनी तो परशु रामाच्या हाती दिला.रामांनी गणेशांना साष्टांग नमस्कार केला. आशिर्वाद देत गणेश म्हणाले, हा दिव्य परशु धारण केल्यामुळे, यापुढे तूं "परशुराम" या नावाने ओळखल्या जाशील.
दिव्य परशुप्राप्तीनंतर राम पृथ्वीप्रदिक्षणे साठी निघाले. शालिग्राम पर्वतावर त्यांची भेट महामुनी कश्यपांशी झाली. त्यांनी रामाला जितेंद्रीय होण्याची मंत्रदीक्षा दिली. त्यांची वाणी अतिशय प्रभावी बनली. अतिशय कमी शब्दात प्रभावि आशय व्यक्त करुं लागले.
पृथ्वीप्रदक्षिणेच्या निमित्याने परशुरामांनी सारा प्रदेश पायाखाली घातला. प्रवासामुळे प्रदेशांचे, परिस्थितीचे, विविध माणसांच्या स्वभावाचे पैलूचे अवलोकन झाले. गणेशांकडून परशू प्राप्त झाल्यावर, भगवान शिवांनी पृथ्वीप्रदक्षिणेची आज्ञा तर, पित्याने आपल्या पूर्वजांच्या आश्रमांना भेटी देऊन त्यांचे आशिर्वाद घेण्यास सांगीतले.
परशुराम प्रवासात असतांना, कैलासहून शिवांनी आदेश दिला, देवेंद्र संकटात असून सैंहिकेय दैत्याने देवांचा पराभव केला व देवेंद्राचे सिंहासनही डळमळत आहे. तूं त्यांना सहाय्य कर. शिवांनी परशुरामांना बोलवल्याचे दैत्यगुरु शुक्राचार्यांना कळल्यावर ते संचित झाले. परशुराम म्हणजे, मानवाच्या रुपात विष्णूच आहे हे ते जाणून होते. त्यांनी सैंहिकेयाला इंद्राशी तडजोड करण्याचा सल्ला दिला. पण त्याने त्यांचा सल्ला न मानतां, परशुरामशी युध्दाला ठाकला. दोघांचे भयंकर युध्द झाले. त्याची चतुरंग सेना नाश पावली. परशुरामाने आपला चिन्मय परशू सैंहीकेयवर फेकून त्याचे मस्तक धडावेगळे केले. बाल परशुरामचा हा अतुलनीय पराक्रम बघून देवेंद्रा सह सारे देव चकित झाले. शिव प्रसन्न होऊन त्यांनी त्यांचे सारे अस्रे, ४१ अस्रे परशुरामांना दिलीत. या अस्रांसोबतच दिव्य धनुष्य अक्षय क्षर, दोन भाले, एक अभेद्य कवचही दिले. शिवांना साष्टांग नमस्कार करुन, परशुराम आपल्या पूर्वजांच्या भेटीसाठी प्रवासास निघाले.
प्रवास करीत परशुराम भागीरथीतीरी आपल्या आजोबांच्या आश्रमात आले त्यावेळी वेदमंत्रांचा जयघोष दुमदुमत होता. आजोबा शिष्यांना संध्या देत होते. आश्रमात येणार्या त्या सतेज तरुणाला बघून, ऋचिकांना साक्षात सूर्यनारायणच आपल्याकडे येत असल्याचा भास झाला. परमूरामने पुढे येऊन त्यांना वंदन करुन आपला परिचय दिला. जवळच सत्यवती बसली होती. आपल्या एवढ्यामोठ्या नातवाला बघून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कांहीकाळ आजोबांकडे घालवल्यावर, एक दिवस राम म्हणाले, आजोबा, मला माझ्या सर्वच पूर्वजांना भेटायची इच्छा आहे तरी मार्गदर्शन करावे.
प्रथम माझे वडिल, तुझे पणजोबा और्व महातेजस्वी होते. हैहयांचे व आपले फार जवळचे संबंध होते. आपण त्यांचे पुरोहित. त्यांंच्या राजपुत्रांना सर्व विद्या, धनुर्वेद आपण म्हणजे, भार्गवांनीच दिले होते. या हैहयांनी अनेक यज्ञ करुन आपली अमाप संपती दान केली त्यामुळे त्यांची परिस्थिती खालावली म्हणून आपणच दान केलेली संपत्ती, भार्गवांवर अत्याचार करुन परत घेतली. या काळात माझ्या आजीची फार वणवण झाली. अनेक हाल अपेष्टा भोगत, लहान मुलाला म्हणजे माझे वडिल और्वांना घेऊन रानावनात भटकत राहिली. हैहय भार्गवांवर करत असलेले अत्याचार, निर्घृण हत्या लहान वयात माझे वडील पाहत होते.
तुझ्या आजोबांनी भार्गवसंघटना करुन हैहय राजांशी सामना दिला. ते विलक्षण संतापले होते. त्या क्रोधाग्नित सारी पृथ्वी होरपळून निघाली. हे सत्र सतत तीन दिवस चालू होते. पण मी या संघर्षापासून दूर राहिलो. मला संघर्षापेक्षा समापोचाराने, प्रेमाने हा संघर्ष थांबवावा असे माझ्या स्वभावानुसार वाटत होते.
माझे आजोबा च्यवन, आजी सुकन्या यांना अवश्य भेट. तसेच आपले कुलपुरुष महायोगी भृगु सध्या ते हिमालयातत वास्तव्यास आहेत. तपस्या, खडतर ज्ञानसाधना, अखंड मनन, चिंतन या मार्गाने त्यांनी अपूर्व ग्रंथखूरचना केल्या आहेत. त्यांचे आशिर्वाद घेऊन, त्यांचेकडून सर्व समजावून घे.
दुसर्या दिवशी आजोबा ऋचिकांचा आशिर्वाद घेऊन परशुराम पुढच्या प्रवासास निघाले.महामुनी च्यवन व माता सुकन्याच्या भेटीनंतर रामांनी हिमालयाकडे प्रयाण केले. तेथील निरव शांतता मनाला वेगळीच अनुभुती देत होते. त्यांना महायोगी भृगुंना भेटण्याची व त्यांनी लिहिलेल्या अपूर्व ग्रंथा विषयी मनात अतिशय कुतुहल निर्माण झाले होते.