⚜️भगवान परशुराम - भाग - ६⚜️
विश्वामित्रांचा जन्म राजकुलात होऊनही त्यांना भोगाचा किंचितही स्पर्श झाला नव्हता. सूर्योपासनेमुळे, त्यांच्या वाणीत प्रस्फुरीत झालेला महान गायत्रीमंत्र सर्व ऋषींच्या उपासनेचा विषय बनला होता. कधी कधी त्यांचे पिता गाधीराजांना विश्वामित्रात काहीशी अहंकाराची छटा जाणवली होती.
राजवंशामधे जन्म झाल्यामुळे, त्यांना कांही काळ राज्यकारभाराची जबाबदारीही स्विकारावी लागली होती. विश्वामित्र पराक्रमी, निर्भय व नियोजन कुशल होते. त्यांच्या क्षात्रवृत्तीला कांही अंशी दर्पाचा स्पर्श झाल्याचे राजाच्या लक्षात आले होते व ती प्रचिती लवकरच आली.
एकदा राजा विश्वामित्र आपली चतुरंग सेना घेऊन राज्यशासन कसे सुरु आहे हे पाहण्या करितां व प्रत्यक्ष प्रजेची भेट व्हावी या उदात्त हेतूने ते भ्रमण करीत असतां फिरत फिरत वसिष्ठ मुनींच्या आश्रमात आले असतां, महात्मा वसिष्ठमुनी आपल्या शिष्यगणांसह त्यांच्या सत्कारास सामोरे गेल. आदर सत्कार, विचारपुस झाल्यावर, विश्वामित्रांनी जाण्याची अनुज्ञा मागीतली. तेव्हा वसिष्ठमुनी म्हणाले, राजन, आपण आलाच आहात तर, आजच्या दिवस थांबून आमच्या आतिथ्याचा स्विकार करावा. विश्वामित्रांनी त्यांची आग्रहाची विनंती मान्य केली.
अगदी थोड्या अवधीत वसिष्ठांनी त्यांचे सारे सैन्य व त्यांना षडरसयुक्त भोजन दिले. विश्वामित्रां च्या मनी प्रश्न उद्भवला... अकिंचन वृत्तीने आश्रमीय जीवन व्यतित करणार्या वसिष्ठांना इतक्या कमी वेळात इतक्या चांगल्या भोजनाची व्यवस्था कशी करुं शकले? त्यांना कांही सिध्दी वगैरे प्राप्त झाली की काय? त्यांनी चौकशी केल्यावर कळले की, त्यांचे जवळ असलेल्या नंदिनी नामक कामधेनूमुळे शक्य झाले. विश्वामित्र अस्वस्थ झाले. माझ्या राज्यात असलेल्या प्रत्येक गोष्टीवर राजाचा अधिकार असतो. या नात्याने त्यांनी वसिष्ठाकडे नंदिनी कामधेनूची मागणी केली. यावर काय बोलावे हे वसिष्ठांना कळेना ते म्हणाले, राजन, आश्रमातील सर्व व्यवहार या नंदिनीच्पा कृपेवर चालतो. हव्य, काव्य, अग्निहोत्र इत्यादी कर्तव्य या नंदिमुळेच सुलभ झाली आहेत. विश्वामित्र म्हणाले, ही सारी कर्तव्ये राजा म्हणून आम्ही पार पाडणार नाही का? निरुपायाने वसिष्ठांनी नंदीनीच्या पाठीवर हात फिरवित म्हणाले, मातेऽ, विश्वामित्र क्षत्रिय आहेत. पृथ्वीवर त्यांची सत्ता आहे. माझे बळ त्यांचेसमोर काय असणार?
ते विश्वामित्रांना म्हणाले, नंदिनीची इच्छा असल्यास तिला नेऊ शकता. मी मात्र तिला स्वतःच्या हाताने निरवणार नाही. धेनूच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, मातेऽ माझ्या ठायीचे ब्राम्हतेज तुझ्याठायी निपेक्षित कारतो, ते तेज तुझे संरक्षण करेल असे म्हणून, वसिष्ठ तेथून निघून गेले.
राजा विश्वामित्राने नंदीनीला सोबत घेण्यासाठी सेवकांना आज्ञा केली. परंतु हे काय? ब्रम्हतेजाचे एक तेजोवलय नंदिनीभोवती निर्माण झाले. ज्यांनी तिला स्पर्श केला त्यांचा नाश झाला. ब्रम्हतेजापुढे क्षात्रतेज नामोहरम झाले. ज्ञानापुढे सत्ता निष्र्पभ झाली. विश्वमित्रांची चतुरंगी सेना नष्ट झाली. या घटनेने विश्वमित्रांमढे आमुलाग्र परिवर्तन झाले. पुत्राच्या हाती राज्य सोपवून ते पुनः तपस्येमधे रममाण झाले.
राजागाधींच्या नेत्रासमोर हे चित्र तरळून गेले. पण आतां सत्यवती व जमदग्नी आल्यामुळे, दोघेही प्रगल्भ बुध्दीचे असल्यामुळे दोघां मामा भाच्या मधे छान जमेल असे राजाला वाटले.
दोन तपांनी मुलगी, जावई व नातवंड आल्यामुळे राजागाधीला अतिशय आनंद झाला. पण ऋचिकांचे मन पाहूणचारात रमले नाही. ज्ञानसागरा मधे बुडलेल्या माणसाला कसे रुचणार? त्यांनी गंगेच्या काठी स्वतंत्र आश्रम स्थापन केला. संसारामधे त्यांना फारसा रस नव्हताच. त्यांनी आश्रमाची जबाबदारी जमदग्नीवर सोपवून स्वतः तासनतास इश्वरचिंतनात मग्न असत.
पिता ऋचिकांनी सोपवलेली जबाबदारी जमदग्नी व्यवस्थित पार पाडत होते. भल्या पहाटे भागिरथीवर जावे. दिवस उगवेपर्यत त्यांची भाव समाधी लागत.उगवत्या सूर्याला अर्ध्य देऊन,आश्रमात परतावे. असा दिनक्रम सुरु असतांना एक दिवस नवल घडले... भागीरथीच्या शांत जलात कमरेपर्यत पाण्यात उभे राहून अर्ध्य देऊन झाल्यावर, जमदग्नी तीराकडे वळले, तो तीरावर एक क्षत्रिय त्यांच्या प्रतिक्षेत उभा दिसला. त्याने वंदन करुन म्हणाला, मी इक्ष्वाकू वंशीय राजा रेणू! आपण माझे राज्यात येऊन, आपल्या सेवेचा लाभ द्यावा, ही विनंती करण्यास आलोय!