⚜️भगवान परशुराम - भाग - १२⚜️

⚜️भगवान परशुराम - भाग - १२⚜️  

    जमदग्नींचा भयंकर क्रोध पाहून रेणूका पुतळ्यासारखी निश्चल उभी असलेली बघून ते ओरडून म्हणाले, जर तूं आता निघून नाही गेलीस तर, मी तुझा जीव घेईन. तिने मनात विचार केला, पतीचरण सोडून दुसरा अपराध घडण्यापेक्षा त्यांच्याच हस्ते मरण आले तर, पुढची दुर्गती टळेल, या विचाराने स्तब्ध उभ्या असलेल्या पत्नीला परत परत सांगूनही ती जात नाहीसे बघून, अत्यंत क्रोधीत होऊन, मोठा मुलगा  रुमण्वत(वसुमंत) ला तिची मान कापण्याची आज्ञा केली. वडिलांची काकुळतेने विणवणी करत, आई परते दुसरे दैवत नाही, मी कशी मातेची हत्या करु?हे ऐकताच जमदग्नींनी त्याच्याकडे एक ज्वलंत कटाक्ष टाकल्याबरोबर तो भस्म झाला.
    दुसरा मुलगा वसु त्याला आज्ञा केली. त्यानेही नकार दिल्यामुळे, त्यालाही भस्मसात केले. त्यानंतर सुषेण व विश्वावसी यांच्याही नकारामुळे तेही पित्याच्या क्रोधाचे बळी ठरले.ते ही भस्मसात झाले. या मधल्या वेळात गंगेकाठी लाकडे आणण्यास गेलेल्या परशुरामांना जमदग्नीची नजर चुकवुन २-३ आश्रमीय पोरं जाऊन, त्यांना ताबडतोब आश्रमात चलण्याची विनंती केली. परशुराम समिधा घेऊन आल्यावर, जमदग्नी त्यांना म्हणाले, तुझ्या आईने महान पातक केले आहे. तुझ्या परशुने तिची मान कापून टाक. परशुरामांचे आपल्या पित्यावर, त्यांच्या विवेक आणि तपसामर्थ्यावर पूर्ण विश्वास होता.तसेच कांही कारण असल्याशिवाय आणि परिणामाची पूर्ण कल्पना असल्याशिवाय पिताश्री अशी आज्ञा देणार नाही. हाच फरक त्यांच्यात आणि भावांमधे होता. ते विष्णू अवतार, जराही संभ्रमित झाले नाही.
   पित्याची आज्ञा होताच, क्षणाचाही विलंब न लावता, हातातल्या परशुने आईची मान उडवली. आईची हत्या करतांना जे जराही कचरले नाही, त्यांनी पुढे पृथ्वी निःशत्रिय केली तर काय आश्चर्य?
       परशुरामांनी मनी कोणताही विकल्प न ठेवता, मातृप्रेम, पापपुण्याचा संभ्रम, शास्रवचन कशाचाही विचार न करतां तात्काळ पितृज्ञाचे पालन केल्यामुळे, जमदग्नी प्रसन्न होऊन म्हणाले, " तूं त्र्यैलौक्यात सर्वमान्य होशील". हवा तो "वर" माग! साक्षात शिवरुप पित्याला अभिवादन करुन, राम म्हणाले, बाबा, आधी माझी आई आणि चारही भावांना जिवंत करावे.तसेच मी चिरंजीवी होऊन मला मातृवधाची स्मृती नसावी.अजिंक्य होऊन सर्वत्र माझा विजय व्हावा. तथास्तु! म्हटल्या बरोबर आई व भाऊ जिवंत झाले.
       रेणूकामाता सजीव झाल्याबरोबर, रामांनी तिचे पाय धरुन अश्रू ढाळू लागले. त्यांना मायेने जवळ घेऊन म्हणाली, बाळ, कसलाही खेद करुं नकोस. हा माझेवर अनुग्रह झाला. आणि पातिव्रत्याची जोपासना  करण्याचे उदाहरण समस्त स्रीजातीसमोर ठेवल्या गेले
   आधुनिक मानसशास्राच्या सिध्दांतानुसार काम ( सेक्सुअल इमपल्स ) आपल्या कळत न कळत ( सब काॅन्शस मांईड) मनात कार्यशील असते. तो जागृत मनात पोहोचेपर्यंत इतका बलवान होतो की, विवेक त्याच्यापुढे टिकत नाही. मोठमोठ्या विद्वावांनाचे शहानपण त्याच्यापुढे मावळते. नैतिक उंचीवरुन खाली खेचतो.
        रेणूका पतीचे पाय धरुन,आपल्याकडून अभावितपणे घडलेल्या, परपुरुषाचा श्रृंगार पाहिल्या गेलेल्या पापाचे क्षालन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांची स्तुती केली. तिने केलेली मधूर स्तुती ऐकून प्रसन्न झालेले जमदग्नीचे प्रेम पूर्वीपेक्षाही वाढले दोघे आनंदाने राहू लागले. दोघांचे मनोमिलन झाले होते. अशा या शिव-पार्वती स्वरुप माता पित्याची सेवा साक्षात विष्णूरुप परशुराम निष्कामपणे मनोभावे करीत होते.
   महिष्मती राजधानीतील भव्य प्रासादात सम्राट कार्तवीर्य आज फारच अस्वस्थ होते. वास्तविक सर्वी सुखे त्यांचे पायाशी लोळण घेत होती.खंबायत च्या आखातापासून गंगायमुनेच्या पलिकडे वाराणसी पर्यत त्यांची सत्ता होती. दक्षिणेस माळवा तर, पूर्वेस बेटावापर्यत, पश्चिमेस वाराणसीपर्यत. त्यांना कोणीही प्रतिपर्धी उरला नव्हता.
    कार्तवीर्यांचे वडिल गणेशभक्त होते,गणेशांच्या प्रसादाने झालेला हा पुत्र जन्मतःच अपंग होता. या पुत्रासाठी कृतवर्य अतिशय दुःखी होते. कार्तवीर्य जसे मोठे होऊ लागले तसे कृतवीर्य जास्तच चिंतातूर बनत चालले. समज आल्यावर कार्तवीर्यांनी बारा वर्ष दत्तोपसना केली. तपस्या पूर्ण झाल्यावर दत्तकृपेने ॐ हा एकाक्षरी गणेशमंत्र कार्तवीर्याला मिळला. या मंत्राच्या उग्र तपस्येने गणेश प्रसन्न होऊन त्यांना सुंदर शरीर व सहस्र बाहुंचे बळ मिळाले. आणि कार्तवीर्य सहस्रार्जुन नांवाने ओळखल्या जाऊ लागले.