⚜️भगवान परशुराम - भाग - १०⚜️

⚜️भगवान परशुराम - भाग - १०⚜️  

      हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या भृगुंच्या आश्रमाजवळ परशुराम आले. तिथले सारे वातावरण अत्यंत आल्हादकारक व उत्साहवर्धक होते. एका विराट अश्वत्थ वृक्षाखाली दर्भासनावर भृगुऋषी ध्यानस्थ बसले होते. पाऊल न वाजवतां परशुराम त्यांचे समोर हात जोडून बसून राहिले.ध्यान संपल्यावर भृगुंनी डोळे उघडताच समोर बसलेल्या तेजस्वी युवकाला बघून त्यांचे मनी खूण पटली. रामच्या मस्तकावर हात ठेवत म्हणाले, आलास? तुझीच वाट बघत होतो. ऐकून परशुराम आवाक झाले. एवढ्यात एका शिष्याने फलाहार समोर आणून ठेवले. घे. प्रवासाने शिणला असशील. पुत्र जमदग्नी, पुत्री रेणूका कुशल आहेत ना? पुत्र जमदग्नीचे वनौषधी प्रयोग सुरु आहेत ना? सर्व कुशल आहे. पिताश्रींनी सध्याच संधी वातावर नवीन औषध तयार केले. इतक्यात माता पौलमी आली.ऋचिकऋषींचा नातू म्हणून ओळख करुन देण्यात आली. रामांनी पौलमी मातेच्या चरणी मस्तक ठेवले.
        दुसर्‍या दिवशी पहाटे उठून परशुराम भृगुं कडे गेले. त्यांना नमस्कार करुन त्यांची ग्रथसंपदा पाहण्याची इच्छा प्रगट केली. त्यांची ज्ञानलालसा बघून, संतुष्ट झालेल्या भृगुंनी जवळच रेशमी वस्रात बांधलेले दोन ग्रंथ रामाच्या स्वाधीन केले.व म्हणाले, आणखीही आहेत. यथावकाश सार्‍या ग्रंथांची माहिती करुन घे.
      दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे स्नानादी कर्मे आटोपून राम अश्वत्थ वृक्षाखाली दोन्ही ग्रंथ घेऊन बसले. पिताश्रींनी भृगुंच्या अलौकिक प्रतिभेविषयी खूप कांही सांगीतले होते. वाचतांना प्रचिती येत होती. ब्रम्हदेवाकडे जगनिर्मितीचे कार्य. त्यांनी नऊ मानसपुत्र  तयार करुन त्यांचेवर प्रजावृध्दीची जबाबदारी सोपवली होती. त्यामधे मारीच, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, ऋतु, दक्ष, अत्री, वसिष्ठ आणि भृगु हे होते. भूृगुंना प्रत्यक्ष शिवांनी सांगीतले, प्रत्येकाला विविध शक्ती प्राप्त झालेल्या श्रृतींचे संरक्षण करायचे आहे. राम एकामागून एक पाने उलगडत होते. त्यातील अलौकिक प्रज्ञेपुढे ते नतमस्तक होत होते. शिववल्ली मधील सर्वच भाग लोककल्याणार्थ असून,  त्यातील विचार उदात्त व समतोल होते. गुण आणि कर्माचा विचार भृगुंनी साकार केला होता.
       शिववल्लीचे प्रकरण संपवून रामांनी पुढील प्रकरण उघडले. आनंदवल्ली! यात भृगुंनी आनंदाच्या कल्पनेचे अति सुक्ष्म विवेचन केले होते. अन्न, प्राण, मन, बुध्दी आणि आनंद याचे चिंतण करुन साधक शिवानंद रुपात विलिन होतो आणि शिवोऽहम् शिवोऽहम् हा साक्षात्कार होतो. साक्षात ब्रम्हदेवांशी आनंदाचे स्वरुप विशद करुन हे अलौकिक ज्ञान भृगुंनी पृथ्वीवर आणले.
      तैतरीय उपनिषदातील ही प्रकरणे वाचण्यात रामांचे दिवस कसे गेले कळलेच नाही. पिताश्री कधीतरी ज्योतीषीविषयक ग्रंथाबद्दल बोलले होते. तो ग्रथ वाचण्याची त्यांना अतिशय उत्सुकता होती. पण मागायचा कसा? या विचारातच रात्री झोपी गेले.
    दुसर्‍या दिवशी आन्हिक उरकवून महायोगी भृगुंचे चरणस्पर्श केल्यावर भृगुंनी रामाच्या हाती ग्रंथ देत म्हणाले, रात्री ज्या ग्रंथाचे चिंतन करत झोपलास तोच हा ग्रंथ आहे. ज्योतीषीविषयक हा "भृगुसंहिता" म्हणून मान्यता पावलेला हा ग्रंथ आहे. ज्योतीष्य हे गणितावर आधारलेले आहे.
   रामांनी भक्तीभावाने ग्रंथ घेऊन, नेहमी प्रमाणे अश्वत्थ वृक्षाखाली बसले. राम जसे जसे वाचत होते, आश्चर्यचकित होत होते. या संहितेमधे माणसाचे भूत, भविष्य आणि वर्तमान सर्वच होते. यातील भविष्य कथनाला काळाची मर्यादा नव्हती. भृगुसंहिता जोवर उपलब्ध आहे, वाचणारा जाणकार आहे आणि  मानवाची जाणून घ्यायची जिज्ञासा जोवर आहे, तोवर म्हणजे जगाच्या अंतापर्यत अस्तित्वात राहील.
           आश्रमात येऊन परशुरामांना जवळ जवळ  महिना होत आला. भृगुंच्या सहवासात येऊन, जीवना चा जणूं अमृतकोषच गवसल्याचा परमानंद झाला. प्रतीतामाह व माता पौलमीचा आशिर्वाद घेऊन, राम हिमालयाच्या दक्षिण दिशेने प्रवास करुं लागले. ते हिमालयाच्या उतुंग रांगा पार करत होते, अचानक बालकाची किंकाळी त्यांच्या कानावर पडली. त्यांनी आवाजाच्या रोखाने बघितले तर, बालक जिवाच्या आतंकाने पळत होते व व्याघ्र त्याच्या मागे. बाळावर तो व्याघ्र झडप घालणार तोच क्षणाचाही विलंब न लावता हातातील परशु वाघाच्या दिशेने फेकला. व्याघ्र मृत होऊन जमीनीवर कोसळला. आणि बालक बेशुध्द झाला होता. परशुरामांनी त्याला शुध्दीवर आणले. बालकाने डोळे उघडल्याबरोबर तो त्यांच्या पायावर डोके टेकवत म्हणाला, आपण मला जीवदान दिले, यापुढे आपणच माझे मातापिता!