⚜️भगवान परशुराम - भाग -१⚜️

⚜️भगवान परशुराम - भाग -१⚜️ 

             विश्वामित्र नदीपात्रात मधोमध उभे राहून योगीराज ऋचिक सूर्याला अर्ध्य देत उभे होते. अर्ध्य देऊन झाल्यावर, नदीकाठाच्या पलिकडे  असलेल्या कुटीकडे शांतपणे जात असतांना त्यांच्या कानावर दोन कन्यांचा बोलण्याचा आवाज आला. ते आवाजाच्या रोखाने गेले असतां नदीमधे दोन कन्या स्नान करीत असलेल्या दिसल्या. त्यातील एकीचे सौंदर्य बघून त्यांच्या मनाच्या तारा झंकारल्या. ऋचिक समोर दिसताच दोघींनी त्यांना वाकून नमस्कार केला.
ऋचिकांनी त्यांचा परिचय विचारुन, या अरण्यात तुम्ही दोघीच कश्या? असे विचारल्यावर, त्यातील एक म्हणाली, मी कान्यकुब्ज देशाच्या गाधी राजाची कन्या सत्यवती ही माझी मैत्रिण मनोरमा. इथून जवळच असलेल्या पर्णकुटीत माझे पिताश्री राहतात. त्यांनी वानप्रस्थाश्रम स्विकारला आहे. आम्ही दोघी रोज याच वेळी या विश्वामित्र नदीवर स्नानास येत असतो. महाराज आपण आमच्याबरोबर पर्णकुटीत येऊन अतिथ्य स्विकारले तर....
                  तिघेही पर्णकुटीत आलेत. गाधीराजाने वानप्रस्थाश्रम स्विकारला असला तरी, कांही सेवक सोबत होते. आश्रमाचा परिसर चांगलाच मोठा होता. बाजूला दोन राजचिन्हांकित युक्त दोन अश्व उभे होते. तेथील प्रसन्न वातावरण बघून ऋचिक ऋषी मनोमन सुखावले. सत्यवतीने आत जाऊन आपल्या पित्याला बाहेर कोणी ऋषी आल्याचा निरोप दिल्यावर, गाधीराजा तत्परतेने बाहेर येऊन ऋचिकांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांचा आदरसत्कार व क्षेमकुशल विचारल्यावर, त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारल्यावर, क्षणभर ऋचिक विचारमग्न झाले आणि म्हणाले, राजन, तुझी कन्या सत्यवती सुशील व लावण्यवती आहे. मी तिच्याशी विवाह करु इच्छितो.
                  राजा गाधी क्षणभर स्तब्ध झाले. प्रत्यक्ष एवढे महान ऋचिक ऋषी आपल्या कन्येला मागणी घालतील हे त्यांच्या स्वप्नातही नव्हते. त्यांची मागणी एकदम अव्हेरताही येत नव्हती. ऋचिकांचे पिताश्री और्यांनी भार्गवांना संघटित करणे सुरु केले आहे हे गाधीराजाला माहित होते. औयांची तपस्या आणि पराक्रम एवढा प्रखर होता की, त्यांचे जन्माचे वेळी  त्यांच्या प्रखर तेजामुळे सर्व क्षत्रिय भयभित झाले होते
अशा या महान तपस्याच्या पुत्राला नाकारणे सोपे नव्हते. कांही विचार करुन....
                  राजागाधी म्हणाले, महाराज, आमच्या पूर्वजांनी कन्येच्या विवाहासाठी कांही अटी ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करणार्‍यालाच आमच्या घराण्यातील कन्या वरल्या जाते. कोणती अट राजन? ज्याचे कर्ण एका बाजूने शामवर्णी आहे असे एक सहस्र (१०००)
शामकर्ण अश्व कन्याधन रुपात जो आणेल, त्यालाच आमची कन्या दिल्या जाते.
                   राजाने मनी विचार केला, या निमित्याने ऋचिकांची कसोटी लागेल. आपली कन्या नुसत्या विद्यावंतालाच नाही तर पराक्रमी वीराला दिल्या जाईल. दुसरे महत्वाचे म्हणजे सत्यवतीचे मन विचारायला अवधी मिळेल. महात्मा ऋचिक म्हणाले, आजपासून बरोबर एक महिण्याने या आश्रमासमोर सहस्र शामकर्ण अश्व उभे राहतील. फलाहार करुन ऋचिकऋषी निघून गेले.
                  ऋचिक तिथून थेट गंगामाईच्या काठी आले. धवलशुभ्र पाण्यात उभे राहिले. डोळे मिटून त्यांचे वाणीतून वरुणोस्र स्रवू लागले.
"निषसाद धृतव्रतो वरुण पत्स्त्या स्वा। सामाज्याय तुः  सक्रतुः । 
  अतो विश्वान्यभुता । चिकित्वाॅं अभिपश्याति । विश्वान्यभुता । चिकित्वाॅं अभिपश्याति ।
कृताति याच कर्त्वा ।।
            आकाशाकडे हात करुन, ते करुणामय स्वरात सहस्र शामकर्ण देण्याची प्रार्थना वरुणदेवाला करुं लागले. हा त्यांचा नित्यक्रमच होऊन गेला. दिवसांमागून दिवस जात होते. एक दिवस महामुनी ऋचिक गंगेकाठी असेच ध्यानस्थ बसले असतां, त्यांचे मनःचक्षुसमोर एक तेजस्वी मूर्ती साकारली. त्यांना पूर्ण खात्री होती, वरुणदेवाचे भृगुकुलावर पुत्रवत प्रेम होते. आपल्या प्रार्थनेला ते नक्की साद देतील, धावून येतील. आणि आज साक्षात भगवान वरुण, सतेज, उजव्या हातात पाश, डाव्या हाताची वरदमुद्रा, रत्नजडित मुकुट, गळ्यात दिव्य रत्नांचा कंठा, कमरबंद, गळ्यात झळझळणार्‍या मोत्यांचे यज्ञोपवित अशा रुपात ते दिसल्याबरोबर ऋचिकांनी मनोभावे हात जोडले.पुत्रा, तुझी इच्छा पूर्ण होवो. आणि थोड्याच वेळात दोन अश्वरक्षक १००० शामकर्ण अश्व घेऊन आले व म्हणाले, आम्ही वरुणदेवाचे सेवक. हे अश्व आपल्याला देण्यास सांगीतले. स्विकार करावा आणि आम्हास जाण्याची अमुमती द्यावी. 
टीपः- कांही ठीकाणी असाही उल्लेख आहे की, ऋचिक ऋषी स्वर्गात जाऊन सहस्र शामकर्ण अश्वांची मागणी केल्यावर, त्यांची परीक्षा पाहण्यासाठी वरुणदेव म्हणाले, यातील कांही अश्व नाठाळ आहेत त्यांना वठणीवर आणा. ऋचिकांनी आपल्या तपः सामर्थ्याने ते अश्व वठणीवर आणून सहस्र शामकर्ण अश्व जिंकले.