⚜️भगवान परशुराम - भाग - ८⚜️

⚜️भगवान परशुराम - भाग - ८⚜️  

     लग्नानंतर जमदग्नी एक वर्ष राज्यात राहिले.  पण मुळातच त्यांना ऐहिक उपभोगाची आवड नसल्या मुळे, राजवैभवाचा त्याग करुन, रेणूकासह भागीरथी तीरी येऊन आश्रमीय जीवन जगत आनंदाने राहू लागले. जमदग्नीला वाटले, सुरुवातीला आश्रमीय जीवन रेणूकाला जड जाईल, पण ती इतकी समरस झाली की, कधी ती राजकन्या होती हे नवख्याला खरे वाटले नसते.
     जमग्नींचा दिवस साचेबंद जात असे. भागीरथी तीरावर संध्या, जपजाप्य, शिष्यांचे पठण, वनातील वनस्पतीचे विविध प्रयोग चालत असे. रेणूका नुसती बघत असायची.
     आज रेणूकाला मनीचे एक गुज पतीला सांगायचे होते. रात्रीचा फलाहार आटोपून दोघेही आश्रमाच्या अंगणातील ओट्यावर निवांत बसले होते. ती संधीची वाट बघत होती. शेवटी तीची चुळबुळ बघून जमदग्नीने विचारले, आर्ये, तुला कांही सांगायचे ना? मग सांग की! आर्य! काल मला स्वप्नदृष्टांत झाला. भगवान विष्णू माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, मी तुझ्या उदरी जन्म घेणार आहे असे म्हणून शंखाचा स्पर्श माझ्या मस्तकाला केला. त्या स्पर्शानेच मला जाग आली.
       हसून जमदग्नी म्हणाले, हे विधिलिखितच आहे. इंद्रदेवांनी मला कामधेनू देतेवेळीच वर दिला होता. दैदिप्यमान आणि साक्षात विष्णूंचा अंश असलेला पराक्रमी पुत्र भृगुकुलात जन्म घेणार आहे. म्हणजे दिसलेले स्वप्न खरे होणार तर?
    यथावकाश रेणूला चार तेजस्वी पुत्र झाले. वसुमती किंवा रुमण्वत, सुषेणझ, वसू आणि विश्ववसु साक्षात सूर्य, इंद्र, अग्नी आणि वायू हेच बालरुप घेऊन रेणूच्या उदरी आले. या चौघांच्या कोडकौतुकात व लालनपालनात तिला दिवस पुरेनासा होई.
      अशातच तिला पांचव्यांदा डोहाळे लागले. यावेळचे डोहाळे विलक्षण होते. एक दिवस भल्या पहाटे ती झोपेत बडबडत होती, मला धनुष्य द्या. या भूमीवर क्षत्रिय माजले आहेत. यांचा निःपात केल्या शिवाय गत्यंतर नाही. शेजारीच असलेल्या जमदग्नी च्या कानी तिचे वाक्य पडले. ते मनी उमगले, इंद्राने दिलेल्या वराच्या फलप्राप्तीचे दिवस जवळ आलेत. पत्नीच्या पोटाला हलकासा स्पर्श करत म्हणाले, नारायणाऽ आम्ही आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहो पतीच्या स्पर्शाने रेणूका जागी झाली. आणि पोटातून एक जीवघेणी कळ उठली. तूं आपल्या कक्षात जाऊन आराम कर. मी तुझ्यासाठी औषध घेऊन येतो. ते मनी उमगले, भगवान विष्णूच्या अवतरणाची वेळ जवळ आली. बारा वाजले. अदिती नक्षत्रावर परमस्वरुप नारायणाने बाळरुपाने रेणूकेच्या उदरी जन्म घेतला.
आपल्या कुशीतील तेजस्वी बालक बघून, रेणूकाच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा पूर लोटला.
      विष्णूरुप तो बाळजीव चुरुचुरु स्तनपान करतांना त्या मातेला अपार आनंद झाला. त्याचवेळी महीष्मती नगरीमधे कार्तवीर्य या कुशीवरुन त्या कुशीवर तळमत होता.
      साक्षात नारायण रेणूकेच्या उदरी आल्याने  सारा आश्रम चैतन्यमय झाला. जमदग्नीने आपल्या पिताश्रींना विचारले, उद्या बाळ बारा दिवसांचा होईल. त्याचे काय नांव ठेवायचे? ऋचिक म्हणाले, सर्व देव ज्याच्या ठीकाणी रमतात, त्या नारायणाचा अंश घेऊन बाळ जन्माला आलेला आहे. त्याचे नाव "राम" ठेवू या. भृगुकुळाचा असा तो भार्गवराम! दिवसामासी राम वाढत होते. सर्वात लहान असून मोठ्या चार भावंडां बरोबर खूप दंगा करायचे. कधी कधी त्यांचा संताप बघून, रेणूकेला खात्री झाली नक्कीच हा क्षत्रिय रक्ताचा वारसा आलाय!
      राम पांच वर्षाचे झाले. जमदग्नींनी वसिष्ठांना पाचारण केले. त्याच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने रामाचे उपनयन संस्कार केले. मुळातच तल्लख बुध्दी असलेल्या, अवघ्या बाराव्या वर्षी ते सर्व वेदशास्रे शिकले. राम सर्व विद्येत प्रविण झाले. एक दिवस जमदग्नी म्हणाले, राम, माझेकडे असलेले सर्व ज्ञान तुला दिले आता तू विद्यादाता गणेशांना प्रसन्न करुन घे.
   पितृज्ञा शिरसावंद्य मानून रामांनी उग्र तपस्या करुन गननायकाला प्रसन्न करुन घेतले. जमदग्नींनी वेदविद्येबरोबर धनुर्विद्येतही रामला पारंगत केले होते. संतुष्ट विघ्नेश्वर गणेशाला नम्रपणे वंदन करुन राम म्हणाले, हे गणनायका, वेदविद्येमुळे ज्ञान मिळाले, परंतु ज्ञानाबरोबर सामर्थ्यही महत्वाचे आहे. शत्रूचा नाश करणारे परशुविद्येची रहस्य मला अवगत करावे. मी नम्रपणे आपल्याला शरण आलोय!